भंडारा जिल्ह्यातील चार तालुक्यांवर दुष्काळ जाहीर करताना अन्याय; निवडीची चौकशी करा — चरण वाघमारे

0
2

– वगळलेल्या तालुक्यांचा तातडीने फेरआढावा घेऊन समावेश करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार गट) मागणी

हंसराज,भंडारा :- राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यांच्या यादीत भंडारा जिल्ह्यातील  सातपैकी केवळ भंडारा, पवनी आणि लाखांदूर या तीनच तालुक्यांचा समावेश करून मोहाडी, तुमसर, साकोली व लाखनी या चार तालुक्यांना वगळण्यात आले आहे. हा धान उत्पादक शेतकऱ्यांवर झालेला मोठा अन्याय असून या निवडीची सखोल चौकशी करावी व वगळलेल्या  तालुक्यांचा तातडीने दुष्काळी यादीत समावेश करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार पक्ष) जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे यांनी केली आहे.

वाघमारे यांनी कृषी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. २१ सप्टेंबर रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संगीता माने यांनी जिल्ह्यात एकही तालुका दुष्काळी नसल्याची माहिती दिली होती. मग अचानक तीन तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश कसा झाला आणि उर्वरित चार तालुके कोणाच्या अहवालावरून वगळण्यात आले? यात काही राजकीय हस्तक्षेप झाला आहे का, याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

जिल्ह्यात जुलै महिन्यातील अपुऱ्या पावसामुळे भात लागवडीला मोठा विलंब झाला असून धरणांमध्येही अपुरा जलसाठा आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची भीती आहे. केवळ कागदी अहवालांच्या आधारे शेतकऱ्यांमध्ये दुजाभाव न करता, प्रशासनाने प्रत्यक्ष शेतपातळीवर जाऊन पर्जन्यमान, लागवड व पिकांच्या स्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करावे आणि पात्र चारही तालुक्यांना दुष्काळी सवलतींचा लाभ मिळवून द्यावा, अशी आग्रही मागणी चरण वाघमारे यांनी केली आहे.