– गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
नागपूर :- आदिवासी हलबा समाज विकास संस्थे च्यावतीने शनिवारी, २६ सप्टेंबर रोजी संत कबीर हायस्कूल, नाईक तलाव, बांग्लादेश, नागपूर येथे शैक्षणिक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. मनोहरराव वाकोडीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शिबिरात इयत्ता ८ वी ते १० वीच्या सुमारे ६० विद्यार्थी- विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. शिबिराचे उद्घाटन चंद्रकला बारापत्रे, संचालिका गणपती फाऊंडेशन (NGO), साहित्यिक -कवयित्री- लेखिका मंजूषा हेडाऊ, आरती गोखले व संत कबीर हायस्कूलचे सचिव जयप्रकाश हेडाऊ यांच्या हस्ते झाले. संस्थेचे सचिव भास्कर चिचघरे यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.

यावेळी इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन नरेश नखाते, विज्ञान विषयाचे मार्गदर्शन मनोज पाखोंडे, तर गणित विषयाचे मार्गदर्शन विनोद आर. निनावे यांनी केले. तसेच बाल लैंगिक शोषणापासून संरक्षण, मुलींची सुरक्षितता, महिला सक्षमीकरण आणि समाजप्रबोधन या विषयांवर पंचपावली पोलीस ठाण्याच्या दामिणी पथकातील PSI पूनम खिल्लारे व शुभांगी बारेकर यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगती सोबतच सामाजिक जाणीव निर्माण करणारे मार्गदर्शन मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. मंजूषा हेडाऊ यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच समाजासाठी योगदान देण्याची भावना विकसित करावी, असे आवाहन केले. उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक करून भविष्यात आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे संचालन संतोष भंडारवार यांनी, तर आभार रविंद्र फनिभरे यांनी मानले. शिबिराच्या यशस्वितेसाठी संस्थेचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.



