संजय राऊत, तुमचा अजेंडा मोडीत काढण्याचे काम संविधानानेच केले 

0
5

– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा प्रहार

मुंबई :- जनाब संजय राऊत, तुम्ही गांधी कुटुंबाचे वकील आहात तर देवेंद्र फडणवीस हे भाजपा आणि संविधानाचे वकील आहेत. आम्ही संविधान, निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली व्यवस्था वाचवण्यासाठी मैदानात आहोत. तुम्ही मात्र या देशात गांधी कुटुंबाची सत्ता वर्षानुवर्षे राहिली पाहिजे, यासाठी वकिली करता. पुन्हा एकदा गांधी कुटुंब सत्तेवर येऊन एकाच कुटुंबाची हुकूमशाही चालली पाहिजे, हा तुमचा अजेंडा मोडीत काढण्याचे काम संविधानाने केले आहे, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कुठेही मतचोरी झालेली नाही तर दुर्दैवाने राहुल गांधी आणि विरोधकांची ”मती” चोरीला गेली असल्याचे सांगत बन म्हणाले, मतचोरीचाच मुद्दा असता तर गेल्या 25 वर्षांपासून उत्तर प्रदेशात तुमची सत्ता नाही. तेथे आधी समाजवादी पार्टीची, बहुजन समाज पार्टीची सत्ता होती. काँग्रेस कुठे होती? बिहारमध्ये सलग 15 वर्षे राष्ट्रीय जनता दलाची सत्ता होती, तिथे काँग्रेस कुठे होती? आधी डाव्यांची सत्ता आणि मग ममता बॅनर्जी अशी 25-30 वर्षे पश्चिम बंगाल हे काँग्रेसमुक्त होते. या देशातल्या उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या प्रमुख राज्यांमध्ये गेल्या 30-35 वर्षांमध्ये कुठेही काँग्रेस नाही. तिथे निवडणूक आयोगावर शंका घेतली होती का? महाराष्ट्र, बिहारमध्ये भाजपा जिंकली की तुमची पोटदुखी होते. यालाच दुटप्पीपणा आणि नौटंकी म्हणतात.

मुळामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि त्यांच्या दोन सहनिवडणूक आयुक्तांनी एकत्रित येऊन सर्व काही खुलासा केलेला आहे. आता संजय राऊत म्हणतात की, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस फोटोसेशनसाठी एकत्र आलेत तसे ते निवडणूक आयुक्त आलेत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हातात हात घालून गेली सात वर्षे महाराष्ट्राचा सुनियोजितपणे कारभार करतात. तुम्ही, तुमचे मालक उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कशासाठी एकत्र येता? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे फोटोसेशन हे दाखवायला असते का? ते प्रत्यक्ष एकत्र असते, तर मुंबई महापालिकेत राज ठाकरे यांच्या पक्षाला फक्त सहा जागांवर समाधान मानावे लागले नसते, असे बन यांनी सुनावले.

विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस यांनी कसा कारभार केला हे महाराष्ट्राने पहिले. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना तुमच्या मालकाला पळता भुई थोडी झाली होती, रात्री झोप लागत नव्हती. तुमच्या मालकांचे पूर्ण राजकीय करिअर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना उध्वस्त झाले होते. हिंमत असेल तर एकदा उद्धव ठाकरेंना जाऊन विचारा. ‘एक तर तू राहशील किंवा मी राहीन,’ असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंची महाराष्ट्राने काय अवस्था केली देवेंद्र फडणवीस यांना आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री केले हे पहा आणि मगच देवेंद्र फडणवीस यांचा नाद करा, असे बन यांनी ठणकावले.