– “मला झालेली अटक ही लोकशाहीची हत्या” — मुकुंद साखरकर यांचा सरकारवर घणाघात; भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचे तीव्र निदर्शने
हंसराज,भंडारा :- मतदार याद्यांच्या ‘एसआयआर’ प्रक्रियेदरम्यान मतदारांच्या नावांबाबत होत असलेल्या कथित फेरफारांच्या निषेधार्थ आणि निवडणूक आयोगाच्या मनमानी कार्यपद्धतीविरोधात भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. मात्र, हे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मुकुंद साखरकर यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेत अटक केली. या कारवाईमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली.
पोलिसांच्या या कारवाईनंतरही काँग्रेस कार्यकर्त्यांनी माघार न घेता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. आपल्या अटकेवर तीव्र संताप व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष मुकुंद साखरकर म्हणाले, “शांततामय आणि लोकशाही मार्गाने आपल्या मागण्या मांडणे हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. मात्र, आंदोलन सुरू होण्यापूर्वीच मला घरातून ताब्यात घेणे ही सरळ सरळ लोकशाहीची हत्या आहे. दडपशाही करून जनतेचा आणि विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे.”
ते पुढे म्हणाले की, “मतदार हा लोकशाहीचा केंद्रबिंदू आहे. मतदार यादीत पात्र मतदारांची नावे सुरक्षित राहणे आणि निवडणूक प्रक्रिया पारदर्शक असणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु ‘एसआयआर’ प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणावर पात्र मतदारांची नावे वगळली जात असल्याचा संशय आहे. निवडणूक आयोगाने याबाबत जनतेच्या शंकांचे निरसन करावे.”
काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात ‘एसआयआर’ प्रक्रियेतील त्रुटींवर बोट ठेवले आहे. निवडणूक आयोगाच्या आयटी (IT) प्रणालीच्या केंद्रीकरणावर तसेच संशयास्पद बदलांवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप नोंदवत त्यांच्याविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली असून, मतदार याद्यांमधील सर्व बदलांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.
आंदोलनादरम्यान काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी “मतदारांचा अधिकार अबाधित राहिला पाहिजे”, “एसआयआर प्रक्रियेत पारदर्शकता आणा” अशा गगनभेदी घोषणा देत जिल्हाधिकारी परिसर दणाणून सोडला.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष मुकुंद साखरकर यांच्यासह प्रमोद तितीरमारे, जय डोंगरे, जयश्री बोरकर, मोहन पंचभाई, पवन मस्के, मनोज बनसोड, रक्षित मेश्राम, रमेश पारधी, प्यारेलाल वाघमारे, राजेश हटवार, प्रदीप बुराडे, आशिष पात्रे, बालू ठवकर, आकाश बोंद्रे, सोनू कोटवाणी, अय्युब पटेल, हितेश लांजेवार, वैभव मेंढे, मंगेश हुमणे, धनराज साठवणे, सदानंद धारगावे, सुभाष आजबले, प्रवीण थुलकर, सुदेश वैद्य, केशव शेंडे, धनराज शेंडे, घनश्याम भांडारकर, आशिष शिवणकर, गजानन बादशाह, पृथ्वी तांडेकर, नरेंद्र साकोरे, उमाकांत राऊत, रामदास पडोळे, संदेश श्यामकुवर, महेश कोराम, श्रीकांत येरपुडे, अजय गोरेकर, जनार्दन निंबार्ते, अक्षत नांदर्धाने, धर्मेंद्र नंदरधने, माणिक ब्राह्मणकर, सुरेश खंगार, शैलेश पडोळे, अवनती राऊत, मनोज देशमुख, मोहम्मद अली खान, नम्रता बागडे, वैशाली भोगे, पौर्णिमा गजभिये, मीरा उरकुडकर, मनोहर उरकुडकर, सुरेखा जनबंधू, नाहीद परवेज, शाहिद अली, मीना जिभकाटे, मिलिंद शिंगाडे, प्रकाश देशमुख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



