दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पीक पंचनाम्यांना प्रारंभ

0
2

– कामठी तालुका ‘ट्रिगर-१’मध्ये; शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी व ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे तहसीलदार गणेश जगदाळे यांचे आवाहन

संदीप कांबळे, कामठी :- कामठी तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची शासनस्तरावर दखल घेण्यात आली असून, कामठी तालुका ‘ट्रिगर-१’मध्ये दुष्काळी तालुका म्हणून घोषित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद करण्यासाठी पीक पंचनाम्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे. या प्रक्रियेला गती देण्यासाठी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी ई-पीक पाहणी तसेच ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी काढण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन तहसीलदार गणेश जगदाळे यांनी केले आहे.

यंदाच्या खरीप हंगामात प्रतिकूल हवामान व पावसाच्या परिस्थितीमुळे पिकांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना संभाव्य शासकीय मदत व दुष्काळाशी संबंधित सवलतींचा लाभ मिळण्यासाठी पिकांच्या नुकसानीची अचूक नोंद प्रशासनाकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यासाठी महसूल व संबंधित यंत्रणेमार्फत पीक पंचनाम्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची ई-पीक पाहणी पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. पीक क्षेत्र व पिकांची माहिती डिजिटल स्वरूपात नोंदविल्यामुळे पुढील प्रशासकीय कार्यवाहीसाठी आवश्यक माहिती उपलब्ध होण्यास मदत होते. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याची ई-पीक पाहणी प्रलंबित राहू नये, याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

त्याचबरोबर ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी काढण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहनही तहसील प्रशासनाने केले आहे. शेतकऱ्यांची अद्ययावत माहिती डिजिटल प्रणालीमध्ये उपलब्ध राहण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित यंत्रणेकडून पंचनामे करण्यात येणार आहेत. पंचनाम्याच्या माध्यमातून पिकांची स्थिती व नुकसानीची नोंद शासनाच्या नियमानुसार करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पंचनाम्याच्या कार्यवाहीसाठी आवश्यक ते सहकार्य करावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

“दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची अचूक नोंद होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पीक पंचनाम्याची कार्यवाही प्रशासनाकडून सुरू करण्यात येत असून, सर्व शेतकरी बांधवांनी ई-पीक पाहणी आणि ॲग्रीस्टॅक फार्मर आयडीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून प्रशासनाला सहकार्य करावे,” असे तहसीलदार गणेश जगदाळे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले.

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना उपलब्ध होणाऱ्या शासकीय उपाययोजनांची कार्यवाही अधिक परिणामकारकपणे राबविण्यासाठी महसूल प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील समन्वय महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आवश्यक डिजिटल नोंदी वेळेत पूर्ण करून पीक पंचनाम्याच्या प्रक्रियेस सहकार्य करावे, असे आवाहन तहसील कार्यालयाकडून तहसिलदार गणेश जगदाळे यांनी केले आहे.