– ‘नागपूर करार’ कुचकामी व अन्यायकारक असल्याचा विदर्भ राज्य आंदोलन समितीचा आरोप; त्रिमूर्ती चौकात जोरदार निदर्शने
हंसराज,भंडारा :- विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती हीच काळाची गरज असल्याचा पुनरुच्चार करत, विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने २८ सप्टेंबर रोजी भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर ‘नागपूर कराराची होळी’ करण्यात आली. या वेळी संतप्त कार्यकर्त्यांनी “स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे”, “नागपूर करार रद्द करा” अशा गगनभेदी घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
२८ सप्टेंबर १९५३ रोजी झालेल्या ऐतिहासिक ‘नागपूर करारा’ची तत्कालीन व त्यानंतरच्या कोणत्याही सरकारने प्रामाणिकपणे अंमलबजावणी केली नाही. या करारातील वैधानिक तरतुदी धाब्यावर बसवून विदर्भाच्या हक्काचा निधी, पाणी आणि रोजगारावर डल्ला मारण्यात आला.
परिणामी, महाराष्ट्रात सामील होऊन विदर्भाचा विकास होण्याऐवजी केवळ अनुशेष आणि मागासलेपणच वाट्याला आले, असा गंभीर आरोप आंदोलकांनी केला.
आंदोलनानंतर समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. हे निवेदन पंतप्रधान कार्यालय (PMO) आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत तातडीने पाठवून स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
या आंदोलनात पूर्व विदर्भ उपाध्यक्ष मुकेश कुमार मेश्राम, तालुकाध्यक्ष भाऊराव बनसोड, कोअर कमिटी सदस्य भगवान झंझाड, माजी अध्यक्ष देविदास लांजेवार, उपाध्यक्ष कृष्णा गुन्हेवार, कृष्णा सपाटे, विष्णुदास बाबुराव लोणारे, मदन मनिराम बोडणे, अनिल उके, अरविंद रामटेके, शालिग्राम बोरकर, जीवन लांजेवार यांच्यासह विदर्भ राज्य आंदोलन समितीचे शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विदर्भप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“नागपूर कराराने विदर्भाला केवळ आश्वासने दिली, न्याय दिला नाही. महाराष्ट्रात ६ दशकांपेक्षा जास्त काळ राहूनही विदर्भातील शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी आणि सिंचनाचा अनुशेष कायम आहे. विदर्भातील नैसर्गिक साधनसंपत्ती विदर्भाच्याच विकासासाठी वापरली जावी यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य हाच एकमेव अंतिम पर्याय आहे.”
— मुकेश कुमार मेश्राम (पूर्व विदर्भ उपाध्यक्ष, विदर्भ राज्य आंदोलन समिती)
“विदर्भाच्या जनतेवर सातत्याने होणारा अन्याय आता सहन केला जाणार नाही. नागपूर करार पूर्णपणे कुचकामी ठरला असल्यानेच आम्ही त्याची होळी केली आहे. जोपर्यंत स्वतंत्र विदर्भाची निर्मिती होत नाही, तोपर्यंत हा लढा अधिक तीव्र केला जाईल.”
— कृष्णा गुन्हेवार ( माजी अध्यक्ष)



