गणेशपूर येथील गणेशोत्सव मेळा वादाच्या भोवऱ्यात; आयोजक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी!

0
4

  – प्रवेशद्वारावरील बॅनरवर ‘ॐ’ ध्वज उलटा लावल्याने भाविकांमध्ये संताप

  – सुरक्षा व नागरी सुविधा धाब्यावर बसवल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार

हंसराज,भंडारा :- गणेशपूर (ता. जि. भंडारा) येथे गणेशोत्सवानिमित्त भरवण्यात आलेल्या भव्य मेळ्यात प्रशासकीय नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मेळ्याच्या प्रवेशद्वारावर श्रीराम मंदिराच्या

प्रतिकृती बॅनरवरील शिखरावर पवित्र ‘ॐ’ चिन्ह असलेला ध्वज उलटा लावल्याप्रकरणी मेळा कंत्राटदार यांच्यावर भंडारा शहर पोलीस ठाण्यात तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच मेळ्यात सुरक्षेच्या त्रुटी असल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

गणेशोत्सवानिमित्त गणेशपूर येथे आयोजित मेळाव्यात अयोध्येतील ‘श्री राम मंदिराची’ बॅनर स्वरूपात भव्य प्रतिकृती मुख्य प्रवेशद्वारावर उभारण्यात आली आहे. या बॅनरच्या एका बाजूला शिखरावरील पवित्र ‘ॐ’ असलेला भगवा ध्वज सरळ आहे, तर दुसऱ्या बाजूला जाणूनबुजून ‘ॐ’ हा शब्द उलटा करून लावण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

‘ॐ’ हे हिंदू समाजाचे सर्वोच्च धार्मिक प्रतीक व आस्थेचे केंद्र आहे. ते उलटे लावून हिंदू धर्माच्या आस्थेची चेष्टा करण्यात आली असून, यामुळे भाविकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. यामुळे परिसरातील शांतता व सामाजिक सलोखा धोक्यात येऊ शकतो, असा आरोप करत ग्रामस्थांनी व पदाधिकाऱ्यांनी मेला कंत्राटदार यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करून तो बॅनर तात्काळ हटवण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

दुसरीकडे, विदर्भ माहिती अधिकार चळवळीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण अंकुश मेहर आणि गणेशपूर तंटामुक्ती अध्यक्ष भावेश वसंत नागपुरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार अर्ज दाखल करत मेळाव्यात सुरक्षेशी संबंधित खालील गंभीर बाबींवर बोट ठेवले आहे:

• अग्निशामक दलाचा अभाव: मेळ्यात हजारो नागरिक येत असूनही संभाव्य आगीच्या दुर्घटनेपासून बचावासाठी अग्निशामक गाडी किंवा पुरेशी सुरक्षा यंत्रणा नाही.

• आपत्कालीन रस्त्यांचा अभाव: चेंगराचेंगरी किंवा दुर्घटना घडल्यास बाहेर पडण्याच्या मार्गांवर दुकाने थाटल्याने अडथळे निर्माण झाले आहेत.

• आरोग्य सुविधा शून्य: प्राथमिक उपचार केंद्र अथवा रुग्णवाहिकेची (Ambulance) कोणतीही व्यवस्था नाही.

• पाणी व शौचालयाची गैरसोय: भाविकांसाठी पिण्याचे शुद्ध पाणी आणि महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालयांची व्यवस्था करण्यात आलेली नाही.

• विमा सुरक्षा नाही: कोणत्याही दुर्घटनेत नुकसानभरपाई मिळण्यासाठी आवश्यक असलेला ‘थर्ड पार्टी पब्लिक लायबिलिटी विमा’ आयोजकांनी घेतलेला नाही.

मेळ्यात दररोज हजारो नागरिक, महिला आणि बालके येत असताना आयोजकांकडून नियमांची पायमल्ली केली जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने घटनास्थळाची पाहणी करून योग्य त्या सुविधा पूर्ण होईपर्यंत मेळाव्यावर कायदेशीर कारवाई करावी, तसेच कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी आयोजकाची राहील, असा इशारा तक्रारकर्त्यांनी दिला आहे.