पुणे :- २०२४ मध्ये झिका विषाणूच्या उद्रेकाचा सामना केलेल्या पुण्यात अद्यापही डासांमध्ये झिका विषाणूची उपस्थिती आढळून आली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अंतर्गत राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था , पुणे येथील वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासात तपासण्यात आलेल्या १२८ डासांच्या समूहांपैकी ३४ समूहांमध्ये झिका विषाणूचा RNA आढळला. हे प्रमाण २६.५ टक्के आहे. या निष्कर्षामुळे भविष्यातील संक्रमणाचा धोका लक्षात घेता डासांवरील आणि विषाणूच्या प्रसारावरील देखरेख अधिक प्रभावी करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
हा सर्वेक्षण अभ्यास जून ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत पुणे महापालिका क्षेत्रातील १६ भागांमध्ये करण्यात आला होता. या संशोधनाचे निष्कर्ष ऑगस्ट २०२६ मध्ये Indian Journal of Medical Research मध्ये प्रकाशित झाले आहेत. अभ्यासादरम्यान NIVच्या वैज्ञानिकांनी डासांमध्ये झिका विषाणूची उपस्थिती तपासण्याबरोबरच त्याच्या आनुवंशिक स्वरूपाचाही अभ्यास केला.
संशोधकांनी झिका संसर्ग झालेल्या रुग्णांच्या घरांमध्ये तसेच त्यांच्या घराभोवती सुमारे ४०० मीटरच्या परिसरातून प्रौढ डास आणि डासांच्या अळ्यांचे नमुने गोळा केले. एकूण ५७७ प्रौढ डास आणि ३,१९० अळ्या गोळा करण्यात आल्या. या नमुन्यांचे १२८ समूह तयार करून त्यांची तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान आढळलेल्या ३४ पॉझिटिव्ह डासांच्या समूहांमध्ये २९ प्रौढ Aedes aegypti डासांचे समूह, चार अळ्यांचे समूह आणि एका Aedes albopictus डासाच्या समूहाचा समावेश होता. त्यामुळे झिका विषाणूचा प्रसार करणाऱ्या डासांच्या प्रजातींच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
अभ्यासात विविध भागांमध्ये विषाणूची उपस्थिती वेगवेगळ्या प्रमाणात आढळली. वारजे परिसरात तपासण्यात आलेल्या २५ डासांच्या समूहांपैकी सात समूह पॉझिटिव्ह आढळले, तर धनकवडीतील १७ समूहांपैकी सहा समूहांमध्ये झिका विषाणूचा RNA आढळला. कोंढवा-येवलेवाडी परिसरातील तपासण्यात आलेले तिन्ही डासांचे समूह पॉझिटिव्ह आढळले. एरंडवणे आणि येवलेवाडी येथील दोन नमुन्यांमध्ये तुलनेने अधिक प्रमाणात विषाणूजन्य RNA आढळून आले.
या निष्कर्षांचा अर्थ पुण्यात सध्या मोठ्या प्रमाणावर झिका संसर्ग सुरू आहे, असा थेट निष्कर्ष काढता येत नाही. मात्र, रोगाचा प्रसार करणाऱ्या डासांमध्ये विषाणूची उपस्थिती आढळल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियमित सर्वेक्षण यांना महत्त्व प्राप्त होते. विशेषतः पावसाळ्यानंतर डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता लक्षात घेता साचलेले पाणी नष्ट करणे, डासांची उत्पत्तीस्थाने कमी करणे आणि नागरिकांमध्ये जनजागृती वाढवणे आवश्यक ठरते.
झिका विषाणूचा प्रसार प्रामुख्याने Aedes प्रजातीच्या डासांमार्फत होतो. त्यामुळे महापालिका प्रशासनाने डास नियंत्रणाच्या उपाययोजनांसोबत संशयित भागांमध्ये नियमित तपासणी आणि निगराणी मजबूत करणे गरजेचे आहे. नागरिकांनीही घराच्या परिसरात पाणी साचू न देणे आणि डासांपासून संरक्षणासाठी आवश्यक खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे.



