– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघाती सवाल
मुंबई :-स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर ‘गुळगुळीत मेंदूचा माणूस’ अशी टीका करणाऱ्या राज ठाकरे यांना त्यांच्यासोबत संवाद साधण्याची वेळ का आली याचे उत्तर जनाब संजय राऊत यांनी द्यावे, अशी घणाघाती टीका भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बन पुढे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांच्यासोबत राज ठाकरे मांडीला मांडी लावून बसणार आहेत का? स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल नको ते शब्द वापरणाऱ्या राहुल गांधींसोबत राज ठाकरे युती करणार आहेत का?, हा माझा राज ठाकरे, मनसेला आणि उबाठा गटाला सवाल आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्रात स्थान नाही, हे राज ठाकरे यांनी जाहीर भाषणात सांगितले होते. मग आता स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींसोबत संवाद साधण्याची वेळ का आली? याचे उत्तर एकदा राज ठाकरे यांनी मनसैनिकांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला द्यावे.
विधानसभा, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या सर्व निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनतेने उबाठा गटाला कायमचे हद्दपार आणि बडतर्फ केले. आता संजय राऊत यांची मागणी आहे की, ज्ञानेश कुमार यांना हटवावे. ज्ञानेश कुमारांना हटवायचे असेल तर केरळमध्ये तुम्ही जिंकलात, तामिळनाडूमध्ये टीव्हीके जिंकली. तिथे तुमच्या खासदार, आमदारांनी राजीनामे द्यायला हवेत का? महाराष्ट्रात निवडणूक झाली तेव्हा ज्ञानेश कुमार मुख्य निवडणूक आयुक्तच नव्हते. ज्ञानेश कुमार यांनी महाराष्ट्राच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका घेतलेल्या नसताना उबाठा गटाला भोपळाही फोडता आला नाही. याला ज्ञानेश कुमार जबाबदार आहेत का?, अशा प्रश्नांची सरबत्ती बन यांनी केली.
महात्मा गांधींनी इंग्रजांविरोधात ‘चले जाव’चा नारा दिला होता. परंतु 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या जनतेने ‘घरी बसा आणि कायमचे घरामध्येच रहा’, असा आदेश उद्धव ठाकरे यांना मतपेटीतून दिला. महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभा निवडणुकीत खडसावून सांगितले की, तुमची पात्रता घरीच बसण्याची आहे. त्यामुळे ‘चले जाव’ चळवळीची आठवण करण्यापेक्षा 2024 ला महाराष्ट्रातल्या जनतेने ‘घरी बसा’ चळवळ सुरू करून तुम्हाला, तुमच्या मालकाला, तुमच्या पक्षाला घरी बसवले, त्याबद्दल संजय राऊत यांनी आत्मपरीक्षण करावे, अशी सूचना बन यांनी केली.
मुळात इंडिया आघाडीचे अस्तित्व नाही. काल काँग्रेसने आपली वेगळी चूल मांडत नागपूरमध्ये आंदोलन केले. 2 तारखेला अभिजीत दीपके आंदोलन करणार आहेत. 4 तारखेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आंदोलन करणार आहेत. अभिजीत दीपके वेगळ्या दिशेने आहेत, काँग्रेसची चूल वेगळ्या बाजूला आहे, मनसे वेगळ्या बाजूला आहे, उद्धव ठाकरे काहीतरी वेगळेच सांगताहेत. त्यामुळे तुमचे धोरण निवडणूक जिंकायची की लोकांकडून पराभव स्वीकारायचा, हे आधी ठरवा. तुम्हाला साधी एका आंदोलनाची तारीख ठरवता येत नाही आणि तुम्ही महाराष्ट्र आणि देश चालवण्याच्या गप्पा करताहात. तुमचा ‘तीन तिघाडा आणि काम बिघाडा’ असल्यानेच महाराष्ट्रातल्या जनतेने नाकारत बाजूला करून ठेवले आहे, असे बन यांनी सुनावले.



