पीक नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्या; राष्ट्रवादी काँग्रेसचे सावनेर SDO यांना निवेदन

0
6

सावनेर :- दि. २७ सप्टेंबर रोजी सावनेर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नागपूर ग्रामीणच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे यांच्या नेतृत्वाखाली सावनेरचे SDO कल्याण कुमार डहात यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनाद्वारे सावनेर तालुक्यातील सोयाबीन, कापूस, संत्रा आदी पिकांच्या नुकसानीची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करावेत आणि पात्र शेतकऱ्यांना नियमानुसार नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

तसेच पात्र शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी प्रक्रिया पूर्ण करून शासनाच्या विविध मदत व नुकसानभरपाई योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली. शेतकऱ्यांच्या अडचणींची गांभीर्याने दखल घेऊन प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

यावेळी जानबाजी मस्के, किरण झाडे, गोपाल घटे, प्रशांत ठाकरे, सुरेंद्र वानखेडे, बाबा झाडे, तुषार गायकवाड, अरविंद भुते, रोशन वानखेडे, मनोहर घटे, कान्हा घटे, दिलावर शेख, अविनाश राऊत, अमोल डहात, यामिनी मंडपे, शीतल माटे यांच्यासह मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव-भगिनी उपस्थित होते.