अखेर मोर्शी तालुक्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी; महसूल-कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर !

0
4

– माजी आमदार देवेंद्र भुयार यांच्या पाठपुराव्याला यश ! 

– संत्रा-मोसंबीसह खरीप पिकांच्या नुकसानीची प्रशासनाकडून प्रत्यक्ष पाहणी ! 

– शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपयांची विशेष मदत देण्याची शासनाकडे मागणी ! 

मोर्शी तालुका प्रतिनिधी :- पावसाचा प्रदीर्घ खंड आणि अपुऱ्या पावसामुळे मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळाचे संकट गडद झाले आहे. संत्रा, मोसंबी, सोयाबीन, कपाशी, तूर, मूग-उडदासह विविध पिकांना मोठा फटका बसला असून, अखेर महसूल व कृषी विभागाचे पथक शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून पिकांची परिस्थिती जाणून घेण्यात आली.

मोर्शी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची गंभीर दखल घेत माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले होते. त्यांच्या पाठपुराव्यानंतर जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आल्याने तहसीलदार सागर ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल व कृषी विभागाच्या पथकाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

शेतकऱ्यांच्या बांधावरच पिकांची गंभीर अवस्था निदर्शनास

पाहणीदरम्यान पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे पिकांवर झालेला परिणाम प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आला. सोयाबीन पिकाला शेंगा भरण्याच्या अवस्थेत पावसाअभावी मोठा फटका बसला असून, कपाशीची पातेगळ, तुरीची खुंटलेली वाढ तसेच संत्रा मोसंबी फळ पिकांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

त्याचबरोबर संत्रा व मोसंबी बागांमध्ये पाण्याअभावी झाडांवर ताण निर्माण होत असून फळगळ आणि उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे खरीप पिकांसोबतच फळबागांच्या नुकसानीचीही स्वतंत्र नोंद घेण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रुपेश वाळके यांनी दुष्काळाची तीव्रता केवळ कागदोपत्री नोंदीवर न ठरवता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीच्या आधारे नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

“मोर्शी तालुक्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र पाहणी करून थांबू नये. प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या नुकसानीची अचूक नोंद करून शासनाने तातडीने मदत जाहीर करावी. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये विशेष आर्थिक मदत देण्यात यावी,” अशी मागणी रुपेश वाळके यांनी केली.

महसूल व कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा निर्माण झाली आहे. आता प्रत्यक्ष पाहणीच्या आधारे तातडीने अहवाल तयार करून मोर्शी तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक मदतीचा निर्णय शासन घेणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

यावेळी ग्राम महसूल अधिकारी सतीश वऱ्हाडे, कृषी सहाय्यक मनीष काळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रुपेश वाळके, उपसरपंच कांचन कुकडे, मनीष गुडधे, शेतकरी शिरीष काळे, स्वप्निल साबळे, सुरेश घोरमाडे, हर्षल राऊत, सूरज खाडगडे, नामदेव खाडगडे, भगवंत साबळे, सचिन बोंडे, गोकुळ अहिरे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.