तुमसर येथे स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; सुगंधित तंबाखूसह ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त

0
4

• विनानंबर मोपेडसह एका आरोपीला अटक; भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल

हंसराज,भंडारा तुमसर :- महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या विविध नामांकित कंपन्यांच्या सुगंधित तंबाखू व पानमसाल्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एका इसमावर स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) भंडाराच्या पथकाने धडक कारवाई केली. या कारवाईत विनानंबर मोपेड आणि विविध प्रकारचा सुगंधित तंबाखू असा एकूण ९४,०८३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका आरोपीविरुद्ध तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खालीद आबीद सय्यद (वय २९ वर्षे, रा. विवेकानंद नगर, तुमसर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, तुमसर शहरात एका विनानंबर दुचाकीवरून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित ठिकाणी नाकाबंदी करून सापळा रचला. दरम्यान, आरोपी खालीद सय्यद हा विनानंबर टी.व्ही.एस. ज्युपिअर मोपेड वरून संशयास्पदरीत्या जाताना आढळला. पथकाने त्याला थांबवून गाडीची झडती घेतली असता, वाहनामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला पान बहार पान मसाला (३ पाकिटे), राजश्री पान मसाला (६ पाकिटे), पान पराग प्रीमियम पान मसाला (५ पाकिटे), ईगल हुक्का शिशा तंबाखू (३ पाकिटे), होला हुक्का शिशा तंबाखू (१ पाकिट), विमल पान मसाला (७ पाकिटे), व्ही-१ तंबाखू (६ पाकिटे), केपी डबल ब्लॅक तंबाखू (६ पाकिटे) असा विविध नामांकित कंपन्यांचा साठा आढळून आला.

पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातील ८५ हजार रुपये किमतीची मोपेड आणि ९ हजार ८३ रुपयांचा सुगंधित तंबाखू व पानमसाला असा एकूण ९४,०८३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांच्या फिर्यादीवरून आरोपी खालीद सय्यद याच्याविरुद्ध तुमसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २२३, २७४, २७५ आणि १२३ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सदरची धडक कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गंगवानी, पोलीस हवालदार डोयले, पोलीस हवालदार बेदुरकर आणि पोलीस शिपाई साठवणे यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहेत.