– तरुणांनी आरोग्याबाबत सजग राहून एड्सला आळा घालावा : सीमा बावनकर यांचे आवाहन
हंसराज, भंडारा लाखनी :- स्थानिक स्वर्गीय निर्धन पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय, लाखनी येथे राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) विभाग आणि ‘रेड रिबन क्लब’ यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स व लैंगिक आजार जनजागृती कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. गणेश कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाखनी ग्रामीण रुग्णालयाच्या सीमा बावनकर उपस्थित होत्या. त्यांनी उपस्थितांना एड्स व गुप्तरोगांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, “एड्स म्हणजे ‘ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम’ (AIDS) हा शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती नष्ट करणारा आजार असून तो ‘एच.आय.व्ही.’ (HIV) या विषाणूमुळे होतो. सद्यस्थितीत एड्सचा प्रादुर्भाव ग्रामीण भागामध्येही झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. यावर प्रतिबंध घालण्यासाठी आणि या आजाराची साखळी तोडण्यासाठी तरुण मुला-मुलींमध्ये व्यापक जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे. आजच्या युवा पिढीने आरोग्याच्या दृष्टीने या विषयाकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले पाहिजे.”
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पुण्यशील टेंभुर्णे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून समन्वयक प्रा. मनीषा सपाटे उपस्थित होत्या. अध्यक्षांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी सजग राहून समाजात जनजागृती करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रा. ज्ञानेश्वरी रांगडाले यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रा. कागदे यांनी मानले. या जनजागृती कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच बहुसंख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.


