spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चंद्रपूर-बल्लारपूर महामार्गावर भीषण अपघात

 

चंद्रपूर १२ : चंद्रपूर-बल्लारपूर महामार्गावर सोमवारी (११ ऑगस्ट) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून, दुसरा गंभीर जखमी झाला आहे. विशाल कैथवास (वय २५, रा. संतोषी माता वॉर्ड, बल्लारपूर) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तर, सुरेश शर्मा (वय २५, रा. डॉ. झाकीर हुसेन वॉर्ड, बल्लारपूर) हा गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विशाल कैथवास आणि सुरेश शर्मा हे दोघे त्यांच्या पल्सर बाईकवरून (एमएच ३४ बीएक्स ८९८२) चंद्रपूरहून बल्लारपूरकडे परत जात होते. याच दरम्यान, नवीन सैनिक स्कूल, भिवकुंड (विसापूर) जवळ त्यांची दुचाकी अनियंत्रित झाली आणि थेट दुभाजकावर आदळली. दुभाजकावर आदळल्याने दोघेही दुचाकीवरून खाली पडले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली.

या अपघाताची माहिती मिळताच विसापूर टोलचे व्यवस्थापक दीपक कंचरलावार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि रुग्णवाहिकेला बोलावले. विशाल आणि सुरेश यांना तातडीने चंद्रपूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच विशालचा वाटेत मृत्यू झाला. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याचे सांगण्यात येत आहे. गंभीर जखमी झालेल्या सुरेश शर्मावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून, पुढील उपचारांसाठी त्याला नागपूर येथे हलवण्यात आले आहे.

या अपघाताची नोंद रामनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक आसिफ राजा यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. अपघाताची नेमकी कारणे शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.

Popular Articles