– भंडारा पोलिसांची थरारक कामगिरी; डोक्यावर गवताच्या पेंढ्या अन् पाठीवर फवारणी यंत्र घेऊन आरोपींना ठोकल्या बेड्या
हंसराज, भंडारा :- गांधी चौकातील पानठेला चालकावर जुन्या वैमनस्यातून तलवार व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करणाऱ्या तीन सराईत आरोपींना भंडारा शहर पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत गजाआड केले आहे. साकोली तालुक्यातील मोहघाटा खैरी येथील घनदाट शेतशिवार व जंगलात लपलेल्या या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी चक्क शेतकऱ्यांचा वेष धारण करून ‘फिल्मी स्टाईल’ सापळा रचला होता. या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
प्रणय उर्फ पन्नू सुनील बोरकर (वय १९, रा. मेंढा), विक्की प्रमोद मुटकुरे (वय १९, रा. नेहरू वार्ड, भंडारा) आणि प्रणय वामन नागोसे (वय १९, रा. शुक्रवारी, भंडारा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून या गुन्ह्यात दोन विधीसंघर्षित बालकांचाही सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २९ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास गांधी चौकातील पानठेला चालक गणेश अशोक लांजेवार हे आपले दुकान बंद करून घराकडे जात होते. त्यावेळी जुन्या वैमनस्यातून दबा धरून बसलेल्या पन्नू बोरकर, विक्की मुटकुरे व त्यांच्या इतर साथीदारांनी गणेश यांच्यावर तलवार व लोखंडी रॉडने सपासप वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
या अचानक झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गणेश लांजेवार यांनी जीवाच्या आकांताने थेट पोलीस ठाण्याच्या दिशेने धाव घेतली. जखमी व्यक्ती पोलीस ठाण्याकडे पळत असल्याचे पाहून हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. रक्ताच्या थारोळ्यात पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या लांजेवार यांच्या डोक्यावर व पाठीवर खोलवर जखमा दिसून आल्याने पोलिसांनी विलंब न करता त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी जखमीच्या तक्रारीवरून भंडारा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९(१), ३५१(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा (अप. क्र. २०३५/२०२६) नोंदवण्यात आला.
घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांनी तातडीने वरिष्ठांना माहिती दिली. गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे (DB पथक) सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष बोरकर व त्यांच्या पथकाने रातोरात शोधमोहीम सुरू केली. आरोपी शहर सोडून पसार झाल्याची व साकोली तालुक्यातील मोहघाटा खैरी येथील जंगल व शेतशिवारात लपल्याची गुप्त माहिती पहाटे पोलिसांना मिळाली. पोलीस साध्या वेषात गेले तरी संशय येऊन आरोपी पळून जाण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी अत्यंत हुशारीने शेतकऱ्यांचा वेष परिधान केला. डोक्यावर जनावरांच्या चाऱ्याच्या गवताच्या पेंढ्या आणि पाठीवर कीटकनाशक फवारणीचे पंप अडकवून पोलीस पथक शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांसारखे संशयित परिसरात शिरले. आरोपींना काही कळण्याच्या आतच पोलिसांनी अचानक झडप घालून तिघांच्याही मुसक्या आवळल्या.
दोन अल्पवयीन मुलांचाही गुन्ह्यात समावेश
ताब्यात घेतल्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच या हल्ल्यात त्यांच्यासोबत दोन विधीसंघर्षित बालके (अल्पवयीन मुले) सामील असल्याचे त्यांनी सांगितले. तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू असून या गुन्ह्यात आणखी काही आरोपींचा सहभाग निष्पन्न होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
वरिष्ठांचे मार्गदर्शन व कौतुकास्पद कामगिरी
ही यशस्वी व धाडसी कामगिरी पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, सहायक पोलीस अधीक्षक (उपविभाग भंडारा) डॉ. तेजस सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत, डी.बी. पथकाचे सपोनि आशिष बोरकर, पोउपनि रोशन ओकटे, पोउपनि घनश्याम नवखरे, सफौ रोशन गजभिये, पोलीस हवालदार प्रशांत कुरंजेकर, अंकुश पुराम, अनुप वालदे, संदीप बंबावले, पोलीस शिपाई रोहित आबाडे, रोहन काळे, रोशन माटे, सुमीत पेशने, संदीप मुळे, सोनाली कुथे तसेच चालक पोहवा लोकेश निर्वाण यांनी केली. अवघ्या १२ तासांत आरोपींना जेरबंद करणाऱ्या पोलीस पथकाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.








