मुंबई :- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्याच्या महसूल विभागात गेल्या दोन वर्षांमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये आणखी एका महत्त्वाच्या निर्णयाची भर पडली आहे. दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आलं आहे. जर दस्त करणाऱ्या पक्षकारांकडे आधार कार्ड नसेल तर त्यांच्या दस्ताची नोंदणी होणार नाही. विविध दस्तांची नोंदणी होत असताना खोटे साक्षीदार आणि खोटे पक्षकार उभे करुन केली जाणारी फसवणूक टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीनं या निर्णयासंदर्भातील राजपत्र प्रकाशित करण्यात आलं आहे.
दस्त नोंदणीसाठी आता आधारकार्ड अनिवार्य
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दस्त नोंदणी संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आधार नाही तर कोणतीच दस्त नोंदणी होणार नाही. दस्त नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आलं आहे. मालमत्ता खरेदी विक्रीतील फसवणूक टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहेत.दस्तनोंदणी, जमीन खरेदी विक्रीच्या प्रकरणांमध्ये खोटे साक्षीदार, खोटे पक्षकार उभे करून होणारी फसवणूक आता हद्दपार होणार आहे. राज्य सरकारनं दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड बंधनकारक केलं आहे. यामुळं खरेदी, विक्री, बक्षीस, गहाण, वाटणीसह 63 प्रकारच्या नोंदीसाठी आधार ओळखपत्र सक्तीचे असेल. दस्तनोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आल्याचा निर्णय 1 ऑक्टोबरपासून लागू करण्यात येणार आहे. यासंदर्भात शासनाचं राजपत्र जारी झालं आहे.
फसवणुकीचे प्रकार हद्दपार
आता दस्त नोंदणी करताना आता आधार कार्ड बंधनकारक करण्यात आल्यानं खोटे साक्षीदार आणि खोटे पक्षकार उभे करता येणार नाहीत. यामुळं दस्त नोंदणीतील फसवणुकीचे प्रकार आता हद्दपार होतील. यामुळं दस्तनोंदणी प्रक्रिया आणखी पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.








