spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आनंददायी शनिवार अंतर्गत तोंडली शाळेत विद्यार्थ्यांचा पाककला उपक्रम 

किशोर साहू, मौदा :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडली येथे ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी पाककला उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. ‘कृतीतून शिक्षण’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी विविध पाककृती तयार करण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

उपक्रमात विद्यार्थ्यांनी पोळी बनविण्याची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष कृतीतून अनुभवली. पोळीसाठी कणिक मळणे, तिचे योग्य आकाराचे गोळे बनवणे, पाटावर लाटणे, बेलनाच्या साहाय्याने पोळीला योग्य आकार देणे आणि त्यानंतर ती तव्यावर भाजणे, या सर्व प्रक्रिया विद्यार्थ्यांनी स्वतः करून पाहिल्या.

तसेच भाजी तयार करण्यासाठी आवश्यक साहित्याची जमवाजमव करणे, साहित्याची निवड करणे, स्वच्छता राखणे आणि भाजी बनविण्याचा योग्य क्रम लक्षात घेऊन कृती करणे, याचा विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला. यामुळे विद्यार्थ्यांना केवळ पाककलेची माहिती न मिळता नियोजन, क्रमबद्धता, स्वच्छता, सहकार्य, वेळेचे नियोजन आणि स्वावलंबन यांसारखी जीवनोपयोगी कौशल्ये शिकता आली.

विद्यार्थ्यांनी गटागटाने उत्साहाने सहभाग घेत एकमेकांना सहकार्य केले. प्रत्यक्ष कृती करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि उत्साह या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.

हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी सहशिक्षक निलेश जाधव यांनी विशेष सहकार्य केले. त्यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन करत उपक्रमाच्या नियोजन व अंमलबजावणीत सक्रिय सहभाग घेतला.

“विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञान न घेता दैनंदिन जीवनातील आवश्यक कौशल्ये प्रत्यक्ष अनुभवातून आत्मसात करावीत, हा या उपक्रमामागील उद्देश आहे,” असे मुख्याध्यापिका अनुराधा विठ्ठल धुर्डे यांनी सांगितले.

या उपक्रमामुळे तोंडली शाळेतील आनंददायी, कृतीशील आणि अनुभवाधारित शिक्षणाला अधिक चालना मिळाली.

Popular Articles