spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या तयारीचा आयुक्तांनी घेतला आढावा

–  मनपाद्वारे १८ ते २२ ऑक्टोबर दरम्यान सुविधांची उत्तम व्यवस्था

नागपूर :- यंदाच्या ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने दीक्षाभूमीवर येणा-या लाखो अनुयायांच्या सोयीसाठी नागपूर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन व समाज कल्याण विभागाद्वारे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध सुविधांच्या तयारीचा मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी मंगळवारी (ता.६) आढावा घेतला.

मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभा कक्षात झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त अंकित, अतिरिक्त आयुक्त मुरुगानंथम एम., अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम, समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, मनपाच्या मुख्य अभियंता लीना उपाध्ये, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, अधीक्षक अभियंता विजय गुरूबक्षाणी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, कार्यकारी अभियंता श्रीकांत वाईकर, राजेंद्र राठोड,  मनोज गद्रे, राजीव गौतम, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे गुल्हाने, मनपाचे सहायक आयुक्त धनंजय जाधव, राजकुमार मेश्राम, परिवहन प्रशासकीय अधिकारी योगेश लुंगे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशभरातून लाखोंच्या संख्येत अनुयायी नागपूर शहरातील दीक्षाभूमीला भेट देतात. या सर्व नागरिकांच्या सोयीसाठी नागपूर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन, समाज कल्याण विभाग व पोलीस प्रशासन यांच्याद्वारे रविवार १८ ते गुरूवार २२ ऑक्टोबर या कालावधीमध्ये सर्व मुलभूत सुविधांची व्यवस्था सुनिश्चित करण्याचे निर्देश मनपा आयुक्त डॉ.विपीन यांनी दिले. याशिवाय सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करून अनुयायांसाठी उत्तम सोयीसुविधा पुरविण्याच्या सूचना दिल्या. तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये, त्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी मनपाचे नियंत्रण कक्ष स्थापन करणे, संपूर्ण परिसरात स्वच्छता राखणे, सर्वत्र विद्युत पुरवठा करणे, पिण्याचे पाणी, शौचालय, परिवहन सेवा या सर्व सुविधा सुरळीतपणे चालविल्या जातील, या दृष्टीने नियोजन करण्याचेही आयुक्त डॉ. विपीन यांनी निर्देशित केले.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांच्या संख्या लक्षात घेता १८ ते २२ ऑक्टोबर या कालावधीमध्ये नागपूर महानगरपालिकेद्वारे दीक्षाभूमीवर अनुयायांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, यंदा दीक्षाभूमी परिसर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसर, माता कचेरी, कुर्वेज शाळा परिसर, आदी ठिकाणी अनुयायांच्या सुविधेसाठी मोठे डोम उभारण्यात येणार आहेत. तसेच बेझनबाग मैदान व उंटखाना मैदानात निवासाची व्यवस्था सामाजिक न्याय व जिल्हा प्रशासन नागपूर, मनपाद्वारे शौचालयाची व्यवस्था केली जाणार आहे.

डोमच्या शेजारी अनुयायांसाठी तात्पुरत्या स्वरुपात शौचालयांची व्यवस्था करणे, दीक्षाभूमीवर येणा-या अनुयायांच्या सेवेसाठी मनपाच्या आरोग्य तपासणी केंद्रांची व्यवस्था करणे. संपूर्ण दीक्षाभूमी परिसरात स्वच्छतेसाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, संपूर्ण परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमे-यांची निगराणी ठेवणे. आदी बाबांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. याशिवाय अंबाझरी तलावावर अनुयायी मोठ्या संख्येत आंघोळीसाठी जात असतात या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन विभागाची चमू, बोट तैनात करण्यासह अंघोळीसाठी तलावात न जाता त्यांना तलावालागतच प्रसाधनगृहांची व्यवस्था उपलब्ध करून देण्यासह आवश्यक त्या सर्व ठिकाणी अतिरिक्त प्रसाधन गृह, शौचालय उभारण्याचे ही निर्देश आयुक्त डॉ. विपीन यांनी दिले.

Popular Articles