spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागपूर-वर्धा जिल्ह्यातील उद्योगांना सुरळीत वीजपुरवठा देण्यास महावितरण कटिबद्ध: संचालक धनंजय औंढेकर यांची ग्वाही

नागपूर :- औद्योगिक ग्राहक हा महावितरणच्या महसुलाचा मुख्य कणा असून, वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे कोणत्याही उद्योगाला फटका बसू नये हीच महावितरणची सर्वोच्च प्राथमिकता आहे. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील उद्योजकांना अत्यंत तत्पर, अखंड आणि दर्जेदार वीजपुरवठा देण्यासाठी महावितरण पूर्णपणे कटिबद्ध असून यासाठी क्षेत्रीय कामकाजात अधिक सुसूत्रता, सुलभता आणि गती आणली जाईल, अशी ग्वाही महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी दिली.

नागपूर येथील विद्युत भवन या परिमंडल कार्यालयात आयोजित विशेष बैठकीत नागपूर व वर्धा जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधताना ते बोलत होते. या प्रसंगी त्यांनी उद्योजकांच्या विविध समस्या व अडचणी आस्थेने ऐकून घेत त्यांच्या तात्काळ निराकरणासाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. या बैठकीला नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेश नाईक, महापारेषणचे मुख्य अभियंता सतिश अणे, अधीक्षक अभियंता अमित परांजपे, प्रफुल लांडे, संजय वाकडे, स्मीता पारखी, वैभव पातोडे आणि दिपाली माडेलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

संचालक धनंजय औंढेकर यांनी पुढे स्पष्ट केले की, औद्योगिक ग्राहकांना विनाव्यत्यय वीजपुरवठा मिळावा यासाठी स्थानिक वीज वितरण यंत्रणेच्या सक्षमीकरणाची व दुरुस्तीची कामे वेगाने पूर्ण करण्यावर भर दिला जाईल. राज्यात वेगाने घडणाऱ्या सौर ऊर्जा क्रांतीमुळे औद्योगिक ग्राहकांवरील ‘क्रॉस सबसिडी’चा आर्थिक बोजा लक्षणीयरीत्या कमी झाला असून वीज खरेदीमध्ये मोठी बचत होत असल्याने आगामी काळात औद्योगिक व व्यावसायिक वीज दर आणखी कमी होत जातील. भविष्यात सौर ऊर्जेमुळे दिवसा घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक अशा सर्वच वर्गवारीतील ग्राहकांना वीजदरात थेट सवलत मिळेल, असा विश्वास व्यक्त केला

या महत्त्वपूर्ण संवाद कार्यक्रमात नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील एमआयडीसी इंडस्ट्रियल असोसिएशन, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, वांजरा इंडस्ट्रियल असोसिएशन, लघु उद्योग भारती, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स, विदर्भ इंडस्टीज असोसिएशन, रुरल विदर्भ इंडस्टीज असोसिएशन यांसह विविध औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेऊन आपल्या मागण्या मांडल्या. त्यावर संचालक औंढेकर यांनी स्थानिक पातळीवरील वीजप्रश्नांचे तातडीने निवारण करण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीला नागपूर व वर्धा जिल्ह्यातील कार्यकारी अभियंते अमित शिवलकर, प्रीती फुले, शर्मिला इंगळे, संतोष क्षीरसागर, धम्मदीप फुलझले, राहुल जीवतोडे, डॉ. गजानन जयस्वाल, प्रशांत टेंभेकर, नरेश पारधी आणि प्रदीप घोरुडे यांच्यासह इतर वरिष्ठ अभियंते व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles