– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी लगावला टोला
मुंबई :- लबाड लांडगा असलेले रोहित पवार हे एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिल्याची थाप मारत आहेत. मंत्र्यांना राजीनामा द्यायचा असेल तर तो मुख्यमंत्र्यांकडे द्यावा लागतो. विधानसभेच्या आमदाराला राजीनामा द्यायचा असेल तर विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या आमदाराला सभापतींकडे द्यावा लागतो. त्याप्रमाणे लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा हा राज्यपाल किंवा राष्ट्रपतींकडे सादर करावा लागतो. कलम 317 नुसार त्यांना संरक्षण मिळालेले असते हे जाणून घेण्यासाठी रोहित पवार यांनी आधी संविधानाचा थोडा अभ्यास करावा, असा टोला भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी लगावला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
रोहित पवारांचे स्वतःचे काहीही कर्तृत्व नाही. आजोबा मुख्यमंत्री होते म्हणून आज रोहित पवार आमदार झालेत; अन्यथा बारामतीत रोहित पवारांना कोणी ग्रामपंचायतीचा सदस्यही केले नसते. रोहित पवार, तुमच्या अहंकारासाठी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पेटवत असलेल्या आंदोलनाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत नाही म्हणून तुम्हाला बारामती ॲग्रोचे कार्यकर्ते आयात करावे लागले ही तुमच्या आंदोलनाची स्थिती आहे. काल स्वत: राज ठाकरे यांनीही रोहित पवारांच्या आंदोलनात जाऊन 1950 च्या कायद्यानुसार एमपीएससी अध्यक्षांना कायदेशीर संरक्षण असल्याचे स्पष्ट केले. एवढेच नाही, तुमचे सरकार आल्यानंतरही तुम्ही ते काढू शकत नाही, असे रोहित पवारांच्या तोंडावर सांगितल्याचे नमूद करीत बन यांनी त्याबद्दल राज ठाकरे यांचे आभार मानले.
रोहित पवारांनी स्वाभिमानाच्या गप्पा कराव्यात का, असा सवाल करीत बन म्हणाले, जेव्हा तुम्ही एका उद्योगपतीचे ड्रायव्हर झाला तेव्हा तुम्ही तुमचा स्वाभिमान गहाण ठेवला होता. बारामतीत अदानी आले होते तेव्हा त्यांचे ड्रायव्हर होत असताना कुठल्या डीलसाठी आपला स्वाभिमान गहाण ठेवला होता, हे एकदा रोहित पवारांनी विद्यार्थ्यांना सांगितले पाहिजे. तुमची कोल्हेकुई आणि लांडग्यासारखी ओरड महाराष्ट्राने बघितली आहे.
रोहित पवार, तुमच्या ट्रोल आर्मीचे लोक माझ्या सोशल मीडिया अकाउंटखाली कमेंट करण्यासाठी तुम्ही लावलेले आहेत. त्यासाठी किमान दोन-तीन कोटींचे बजेट ठेवले आहे. पण तुमच्या ट्रोल धाडीला घाबरणारा मी नाही. मी भाजपाचा कार्यकर्ता आहे. त्याआधी अभाविपचा कार्यकर्ता होतो. 2004 साली बीड शहर मंत्री म्हणून मी परिषदेचे काम केले तेव्हा तुम्ही राजकारणात कुठेही नव्हता. आजोबांच्या जीवावर आमदार झालेल्यांनी भाजपावर टीका करू नये, असे बन यांनी सुनावले.
बन पुढे म्हणाले, कालच्या आंदोलनात विक्रम पाचपुते यांना ‘मी पुन्हा विधानसभेत जाऊ देणार नाही,’ अशा पद्धतीची घोषणा रोहित पवारांनी केली आणि तिथे बसलेले कार्यकर्ते टाळ्या वाजवतात. याचा अर्थ स्पष्ट होता की, तिथे घोषणाबाजी करणारे, टाळ्या वाजवणारे हे रोहित पवारांचे कार्यकर्ते होते, विद्यार्थी नव्हते. आमदार विक्रम पाचपुते यांना विधानसभेत जाऊ द्यायचे का नाही, हे भाषण एमपीएससीच्या आंदोलनात होत असेल तर ते आंदोलन राजकीय आहे का विद्यार्थ्यांचे, हे महाराष्ट्राने ठरवावे.







