spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अमराठी चालकांनी ‘मराठी संवाद भाषा’ अभियानात सहभागी व्हावे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

· स्थगितीचा कालावधी मराठी शिकण्यासाठी वापरा

· १८ ऑगस्ट २०२७ नंतर नियमांची काटेकोर अंमलबजावणी होणार

मुंबई :- महाराष्ट्रात व्यवसाय करताना येथील नागरिकांशी दैनंदिन व्यवहार करण्यासाठी मराठी भाषेत संवाद साधता येणे महत्त्वाचे आहे. रिक्षा, टॅक्सी तसेच ॲपआधारित प्रवासी वाहने चालविणाऱ्या अमराठी चालकांनी मराठी भाषा शिकण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी संवाद भाषा अभियानात’ सहभागी व्हावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

‘महाराष्ट्र माझा! मराठी माझी संवाद भाषा!’ अभियानाच्या पुढील टप्प्याच्या नियोजनासंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीस परिवहन विभागाचे आयुक्त राजेश नार्वेकर, अपर परिवहन आयुक्त रवी गायकवाड, कोकण मराठी साहित्य परिषदेचे प्रदीप ढवण, मराठी भाषा विभागाचे सहसचिव डॉ. नामदेव भोसले, मराठी विश्वकोश मंडळाचे डॉ. शामाकांत देवरे तसेच राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

महाराष्ट्रात राहून व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक प्रवासी वाहनचालकाला प्रवाशांशी सहज आणि आत्मविश्वासाने संवाद साधता यावा, या उद्देशाने परिवहन विभाग, मराठी भाषा विभाग आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाच्या पहिल्या टप्प्यात राज्यभरात १८० हून अधिक ठिकाणी प्रशिक्षण केंद्रे सुरू करून, सुमारे १,८०० शिक्षकांच्या माध्यमातून १ लाख ६५ हजार ८०० हून अधिक अमराठी चालकांना व्यावहारिक मराठीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की, राज्यात ९ लाखांहून अधिक रिक्षा व टॅक्सी चालकांकडे नोंदणी व बॅज (प्रमाणपत्र) आहेत. राज्यात सुमारे ९ लाख ७८ हजार रिक्षा व टॅक्सी चालक कार्यरत असून, त्यामध्ये सुमारे ९ लाख १६ हजार ऑटोरिक्षा चालक आणि ६१ हजारांच्या आसपास टॅक्सी चालकांचा समावेश आहे. मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) रिक्षाचालकांची संख्या ४ लाख ४० हजार २३८, तर टॅक्सीचालकांची संख्या ४३ हजार १०६ इतकी आहे. या सर्व चालकांनी मराठी भाषा प्रशिक्षणाचा लाभ घेऊन प्रशिक्षण पूर्ण करावे, असे आवाहन करण्यात आले.

मात्र, राज्यातील मोठ्या संख्येने अमराठी चालक अद्याप व्यावहारिक मराठीच्या प्रशिक्षणापासून दूर आहेत. त्यामुळे उर्वरित चालकांपर्यंत पोहोचण्यासाठी अभियानाचा दुसरा टप्पा अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. प्रशिक्षण केंद्रांबरोबरच ऑनलाइन माध्यमातूनही व्यावहारिक मराठी शिकण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

दरम्यान, व्यावहारिक मराठीसंदर्भातील सुधारित नियमांच्या अंमलबजावणीला १८ ऑगस्ट २०२७ पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. मात्र, ही स्थगिती म्हणजे नियम रद्द झाले आहेत, असा त्याचा अर्थ नाही. त्यामुळे या कालावधीचा उपयोग मराठी भाषा शिकण्यासाठी करावा आणि भविष्यात नियमांची अंमलबजावणी सुरू होण्यापूर्वी स्वतःला तयार करावे, असे आवाहन मंत्री सरनाईक यांनी केले.

“मराठी शिकण्यासाठी शासनाने प्रशिक्षणाची दारे खुली केली आहेत. स्थगितीचा कालावधी हा मराठी शिकण्यापासून दूर राहण्यासाठी नसून स्वतःला तयार करण्यासाठी मिळालेली संधी आहे. प्रत्येक अमराठी चालकाने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी संवाद भाषा अभियानात’ सहभागी होऊन व्यावहारिक मराठी आत्मसात करावी. प्रवाशांशी त्यांच्या भाषेत संवाद साधल्याने प्रवास अधिक सुलभ आणि आपुलकीचा होईल,” असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

प्रवासी आणि चालक यांच्यातील संवादातील अडथळे दूर करणे, महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा अधिक दृढ करणे आणि प्रवाशांना सुरक्षित व सुलभ सेवा उपलब्ध करून देणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे “आजच मराठी शिका, उद्याच्या नियमांसाठी सज्ज व्हा!” या भावनेतून राज्यातील सर्व अमराठी रिक्षा, टॅक्सी आणि ॲपआधारित वाहनचालकांनी अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री सरनाईक यांनी केले.

स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने मोठ्या संख्येने चालक प्रशिक्षणासाठी उपलब्ध होत असलेल्या ठिकाणी स्थानिक शाळा अथवा इतर उपलब्ध जागांचा वापर करून प्रशिक्षणाची व्यवस्था करावी. यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी आवश्यक समन्वय साधावा, असे निर्देशही बैठकीत देण्यात आले.

Popular Articles