spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राहुल गांधींच्या दिल्लीतील मोर्चासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना धमक्या

– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी पुराव्यानिशी केला खळबळजनक पर्दाफाश

दिल्लीत सुरु असलेल्या राहुल गांधी यांच्या आंदोलनाला उपस्थित राहण्यासाठी युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तातडीने दिल्लीत दाखल व्हावे. अन्यथा निलंबनाची कारवाई करत तुम्हाला पुन्हा कोणतीही निवडणूक लढू दिली जाणार नाही, असे युवक काँग्रेसचे सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी अजय चिकारा युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना धमकावत असल्याची ध्वनीफीत दाखवत भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी काँग्रेसच्या राजकारणाचा सोमवारी पर्दाफाश केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राहुल गांधी यांच्या काँग्रेसमध्ये कशा पद्धतीने हुकूमशाही सुरू आहे, याचे हे सर्वात उत्तम उदाहरण असल्याचे सांगत बन म्हणाले, राहुल गांधी, तुम्हाला आंदोलन करायचे असेल, चळवळ उभी करायची असेल, तर नक्की करा. मात्र, त्यासाठी तुमच्याकडे सामर्थ्यही नाही आणि कर्तृत्वही नाही. हा रविवारचा ऑडिओ आहे. तुम्ही ज्या शहरात असाल ते शहर सोडा आणि तातडीने सोमवारी दिल्लीत हजर व्हा, असे आदेश महाराष्ट्रातील युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना प्रभारींकडून दिले जात असल्यानेच कदाचित काल विश्वजित कदम यांनी एमपीएससीचे आंदोलन अर्धवट सोडून दिल्ली गाठली असेल. कारण त्यांनाही अशा धमक्या दिल्या गेल्या असाव्यात. हा अतिशय गंभीर प्रकार आहे. या प्रकरणी स्वतः राहुल गांधी यांनी खुलासा केला पाहिजे.

बन पुढे म्हणाले, एका बाजूला राहुल गांधी देशात हुकूमशाही सुरू असल्याचे सांगतात. मात्र, आता त्यांच्या पक्षात सुरू असलेल्या हुकूमशाहीची ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप समोर आली आहे. राहुल गांधी यांना रिलाँच करण्यासाठी कशा पद्धतीने हुकूमशाही केली जात आहे, याचा भांडाफोड या व्हिडिओच्या माध्यमातून झाला आहे. धमक्या देऊन हुकूमशाहीची प्रवृत्तीच पुढे न्यायची आहे का? ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. ही हुकूमशाही तुम्ही सहन करणार आहात का?, असा सवालही बन यांनी काँग्रेसच्या सर्व नेत्यांना केला.

या देशात अराजकता निर्माण करायची आणि बांगलादेश, नेपाळ व श्रीलंकेसारखी परिस्थिती व्हावी, यासाठी कदाचित राहुल गांधी यांचे हे षडयंत्र असेल. म्हणूनच महाराष्ट्रातील हे उदाहरण समोर आले आहे. कदाचित कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्येही युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अशाच धमक्या दिल्या जात असतील. आंदोलनाला गर्दी जमत नाही म्हणून पदाधिकाऱ्यांना धमक्या देऊन बोलावले जात असेल तर राहुल गांधी, तुमची केविलवाणी अवस्था झाली आहे. राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयाविरोधात आंदोलन करत आहेत. त्यांचा सर्वोच्च न्यायालयावर, निवडणूक आयोगावर आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानावरही विश्वास नाही. या देशातील जनतेचाही राहुल गांधी यांच्यावर विश्वास नाही. 2014, 2019 आणि 2024 मध्येही नव्हता आणि 2029 मध्येही जनतेचा तुमच्यावर विश्वास नसेल, असे  बन यांनी सुनावले.

पुण्यात सुरु असलेले एमपीएससी आंदोलन मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या भेटीनंतर मागे घेण्यात आले. वास्तविक विवेक भीमनवार एमपीएससीचे अध्यक्ष असताना पेपरफुटीची घटना घडली नव्हती. तरीही भीमनवार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून स्वतः रजेवर जाण्याचा निर्णय घेतल्याने मी त्यांचे मनापासून स्वागत करतो आणि त्यांचे आभारही मानतो. वास्तविक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांसोबत रहात सर्व मागण्या मान्य केल्या होत्या. तरीही दुर्दैवाने या आंदोलनाला राजकीय वळण मिळाले. मात्र देवाभाऊ कायम विद्यार्थ्यांसोबतच राहतील, असे बन यावेळी म्हणाले.

Popular Articles