वर्धा :- यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे विदर्भासह वर्धा जिल्ह्यात शेतीसाठी पाणी उपसा प्रचंड वाढला आहे. अशा वेळी ऐन पिकाच्या वाढीच्या टप्प्यात वीज खंडित न होता सुरळीत मिळावी आणि रोहित्र जळण्याचे प्रकार थांबावेत, यासाठी महावितरणच्या मार्गदर्शनाखाली वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एक अत्यंत कौतुकास्पद व सकारात्मक पाऊल उचलले आहे. कृषी पंपांवर कॅपॅसिटर बसवून शेतकऱ्यांनी ट्रान्सफॉर्मरवरील अतिरिक्त भार यशस्वीपणे कमी केला असून, स्वतःची मोटार जळण्यापासून वाचवत अखंडित वीजपुरवठ्याचा लाभ मिळवला आहे.
शेतातील कृषी पंपांना ऑटोस्विच लावल्यामुळे वीज येताच सर्व पंप एकाच वेळी सुरू होऊन ट्रान्सफॉर्मरवर अचानक प्रचंड ताण येतो. यामुळे रोहित्र जळणे, तारा तुटणे आणि बारंवार ट्रिपिंग होणे यांसारख्या गंभीर समस्या निर्माण होतात. थ्री-फेज इंडक्शन मोटारी सुरू होताना वीज वाहिन्यांवरून आवश्यकतेपेक्षा सुमारे 30 टक्के अतिरिक्त रिॲक्टिव्ह पॉवर खेचतात. या तांत्रिक अडचणींवर कॅपॅसिटर हा अत्यंत साधा पण अत्यंत प्रभावी उपाय ठरत आहे. कॅपॅसिटर थेट स्थानिक पातळीवरच रिॲक्टिव्ह पॉवर पुरवतो, ज्यामुळे मुख्य वीज वाहिनीवरून वाहणारा अतिरिक्त 30 टक्के वीज प्रवाह लगेच कमी होतो आणि व्होल्टेजचा दर्जा सुधारून सर्व ग्राहकांना योग्य दाबाने वीज पुरवठा मिळतो.
हा उपक्रम महावितरणच्या वर्धा जिल्ह्याच्या अधीक्षक अभियंता स्मीता पारखी आणि वर्धा विभागाचे कार्यकारी अभियंता नरेश पारधी यांच्या सूचनेनुसार अभियंता गौरव वाटकर, निखिल भलमे, प्रज्वल चचारे, अजय पांडे व बाह्य स्त्रोत तंत्रज्ञ राहुल कांबळे यांच्या प्रत्यक्ष तांत्रिक मार्गदर्शनाखाली पार पडला. या आवाहनाला प्रतिसाद देत अभिजित निवृत्ती टिटरे, संजय बोबडे, भोजन पाटील, रजत गावंडे, पप्पू बोबडे आणि सुभाष झालके या वर्धा विभागातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी आपल्या कृषी पंपांवर कॅपॅसिटर बसवून सुरक्षित व सक्षम वीज व्यवस्थेचा वस्तूपाठ घालून दिला आहे.
अवघ्या 300 ते 500 रुपयांच्या नाममात्र खर्चात मिळणाऱ्या या उपकरणाची निवड करताना 3 एचपी मोटारीसाठी 1 केव्हीएआर, 5 एचपी मोटारीसाठी 2 केव्हीएआर आणि 7.5 एचपी मोटारीसाठी 3 केव्हीएआर क्षमतेचा कॅपॅसिटर पुरेसा ठरतो. कॅपॅसिटरची जोडणी करताना तो ईनकमींग साईडला न लावता नेहमी स्टार्टर आणि मोटरला जोडलेल्या वायरच्या दरम्यान लावावा, जेणेकरून मोटार सुरू असतानाच तो कार्यरत राहील. या लहानशा उपायामुळे शेतकऱ्यांची हजारो रुपयांची मोटार जळण्यापासून वाचत असून शेतातील पिकांनाही वेळेवर पाणी मिळत आहे. महावितरणच्या या मोहिमेत सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होऊन ऑटोस्विच काढून त्वरित कॅपेसिटर बसवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.








