– काँग्रेस, महाविकास आघाडीचे ॲड. अभिजित वंजारी यांचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध
– पेपरफुटीला आळा, रोजगाराच्या संधी, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण आणि शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर भर
नागपूर :- नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार ॲड. अभिजित गोविंदराव वंजारी यांनी पदवीधरांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण, रोजगारनिर्मिती, परीक्षा पद्धतीत सुधारणा आणि भविष्यवेधी कौशल्य विकासावर भर देणारा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. ‘मिशन जॉब्स’ आणि ‘मिशन एक्झाम’ या दोन संकल्पनांच्या माध्यमातून पदवीधर, बेरोजगार तरुण, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
नागपुरातील दत्तात्रय नगर येथील जनसंपर्क कार्यालयात आज (ता. 12) आयोजित पत्रपरिषदेत आमदार अभिजित वंजारी यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी त्यांनी जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यात आलेल्या मुद्यांची आणि आतापर्यंत केलेल्या कामांची माहिती पत्रपरिषदेत दिली.
नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांतील पदवीधरांना केंद्रस्थानी ठेवून हा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. रोजगाराच्या संधी वाढविणे, स्थानिक उद्योगांना चालना देणे, स्पर्धा परीक्षांमधील पारदर्शकता, डिजिटल शिक्षण, सामाजिक न्याय आणि शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविणे या प्रमुख मुद्द्यांचा त्यात समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
रोजगारनिर्मिती आणि आधुनिक कौशल्य विकासावर भर
‘मिशन जॉब्स’अंतर्गत पदवीधरांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देणे, स्थानिक पातळीवर उद्योग-उद्योजकतेला प्रोत्साहन देणे आणि बदलत्या तंत्रज्ञानानुसार तरुणांना प्रशिक्षित करण्याचा संकल्प जाहीरनाम्यात व्यक्त करण्यात आला आहे. पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यांत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), डेटा सायन्स आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणारी ‘एआय डिस्ट्रिक्ट हब्स’ स्थापन करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
स्पर्धा परीक्षा आणि करिअर मार्गदर्शनासाठी सहाही जिल्ह्यांच्या मुख्यालयात डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या नावाने पदवीधर भवन उभारण्याचा प्रस्ताव आहे. या भवनांमध्ये स्पर्धा परीक्षा अभ्यासिका, डिजिटल ई-लायब्ररी, करिअर समुपदेशन केंद्र आणि स्टार्टअप इनक्युबेटर यांचा समावेश असेल. नामांकित कंपन्यांच्या सहभागातून रोजगार मेळावे आयोजित करणे, बेरोजगार तरुणांसाठी मासिक पाच हजार रुपयांचा बेरोजगारी भत्ता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आणि स्थानिक उद्योगांमध्ये स्थानिक पदवीधरांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी वैधानिक हमीच्या दिशेने प्रयत्न करण्याचेही जाहीरनाम्यात नमूद असल्याचे त्यांनी सांगितले.
पेपरफुटीविरोधात कठोर उपाययोजनांचा निर्धार
स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी रोखणे, परीक्षा प्रक्रिया पारदर्शक करणे आणि निकाल व नियुक्त्या वेळेत होण्यासाठी सुधारणा करणे, हा ‘मिशन एक्झाम’चा मुख्य उद्देश आहे. शासकीय भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती घेण्याचा आग्रह, स्वतंत्र परीक्षा आयोगाची स्थापना आणि स्पर्धा परीक्षांसाठी एकदाच नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
स्पर्धा परीक्षांच्या तणावाचा सामना करणाऱ्या बेरोजगार तरुणांसाठी मोफत समुपदेशन आणि मानसोपचार हेल्पलाईन सुरू करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे. एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मोफत कार्यशाळा आयोजित करण्यावर भर देण्यात आला आहे.
शिक्षक, कर्मचारी आणि सामाजिक न्यायाचे प्रश्न
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांमध्ये जुनी पेन्शन योजना, विनाअनुदानित शाळांना टप्पा अनुदान, कॅशलेस वैद्यकीय प्रतिपूर्ती, शालार्थ आयडी, संच मान्यता, प्राध्यापकांच्या पदोन्नती आणि शिक्षकांना अशैक्षणिक कामांतून मुक्त करणे या विषयांचा समावेश आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आश्वासित आणि कालबद्ध प्रगती योजना लागू करण्यासाठी तसेच टीईटी परीक्षा रद्द करण्यासाठी प्रयत्न करण्याचेही नमूद करण्यात आले आहे.
मागासवर्गीय, ओबीसी आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी राज्यातील ३६ जिल्ह्यांत प्रत्येकी दोन सुसज्ज शासकीय वसतिगृहे उभारण्यासाठी पाठपुरावा करणे, महाज्योती, सारथी, बार्टी, टार्टी आणि मार्टी या संस्थांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, विद्यार्थ्यांसाठी अर्थसंकल्पीय तरतूद वाढविणे, ओबीसींची जातनिहाय जनगणना आणि क्रिमी लेअरची मर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, अशा बाबींचाही जाहीरनाम्यात समावेश असल्याची माहिती आ. अभिजित वंजारी यांनी यावेळी दिली.
मागील सहा वर्षांतील कामांचा आढावा
जाहीरनाम्यात मागील सहा वर्षांतील कामांचाही आढावा मांडला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, पदवीधर मतदारसंघातील सहाही जिल्ह्यांत त्यांनी साडेतीन लाख किलोमीटरहून अधिक प्रवास करून नागरिकांशी संपर्क साधला. विधान परिषदेत प्रश्न, तारांकित प्रश्न, चर्चा आणि धोरणात्मक मुद्द्यांच्या माध्यमातून ३५० हून अधिक वेळा जनहिताचे विषय उपस्थित केले.
आमदार विकास निधीतून २७ कोटी रुपयांची कामे मंजूर झाल्याचे नमूद करताना शाळा, महाविद्यालये आणि ग्रंथालयांचे डिजिटल सक्षमीकरण, स्पर्धा परीक्षा पुस्तकांची उपलब्धता, पायाभूत सुविधा आणि क्रीडा सुविधांसाठी निधी दिल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत २२ रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून आठ हजारांहून अधिक पदवीधरांना रोजगार मिळवून दिल्याचेही त्यां यावेळी सांगितले. नागपूर विद्यापीठाच्या विकासासाठी निधी, शाळा-महाविद्यालयांचे डिजिटलायझेशन, शिक्षकांच्या प्रश्नांचा पाठपुरावा आणि एमपीएससी उमेदवारांच्या नियुक्त्यांसाठी केलेल्या प्रयत्नांचाही त्यात उल्लेख आहे.
२३ ऑक्टोबरला मतदान
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट), विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ आणि इतर मित्रपक्ष व शिक्षक-कर्मचारी संघटनांच्या पाठिंब्याने ॲड. अभिजित वंजारी निवडणूक रिंगणात आहेत. पदवीधरांनी आपल्या नावासमोरील पहिल्या पसंतीचा ‘१’ हा क्रमांक नोंदवून पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.








