– संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना
– महापौर निता ठाकरे यांनी घेतला आढावा
– नागपूरकरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा : महापौर
नागपूर :- नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध नसल्याने संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने विविध उपाययोजना करण्याचे प्रस्तावित केले आहे. पिण्याच्या पाण्याचा वापर वाहने धुणे किंवा बगिचासाठी वापर केल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर दंड ठोठावण्याचे प्रस्तावित आहे. महापौर निता ठाकरे यांनी नागपूर शहराच्या संभाव्या पाणी टंचाईच्या संदर्भात जलप्रदाय विभाग व ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जलसाठ्याच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी महापौर यांनी नागरिकांना संभाव्य पाणी टंचाईची परिस्थिती लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा गैरवापर टाळावा, पाणी जपून वापरावे असे आवाहन केले.
यावेळी उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेता नरेंद्र (बाल्या) बोरकर, जलप्रदाय समितीच्या सभापती दिव्या धुरडे, आरोग्य समितीच्या सभापती मनीषा अतकरे, धरमपेठ झोनच्या सभापती धनश्री देशपांडे, अतिरिक्त आयुक्त मुरुगानंथम एम., अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता श्रीकांत वाईकर यांच्यासह ओसीडब्ल्यूचे अधिकारी उपस्थित होते.
यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये केवळ 58 टक्के साठा आहे. पाण्याची उपलब्धता विचारात घेऊन याद्वारे पुढील उपाययोजना प्रस्तावित करण्याचे निर्देश महापौर ठाकरे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.
बेकायदेशीर जोडण्यांवर कारवाई
सणासुदीचा काळ असला तरी बेकायदेशीर जोडण्यांद्वारे पाणी घेणाऱ्यांविरुद्ध कठोर मोहीम राबविण्यात येईल. अशा ग्राहकांना त्यांची जोडणी बेकायदेशीरवरून कायदेशीर करून घेण्याची संधी देण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तात्काळ शिबिरे आयोजित करण्यात येतील. त्यानंतर बेकायदेशीर जोडणीच्या ठिकाणी मीटर बसवावेत आणि मीटरमध्ये छेडछाड झाल्याचे किंवा तो काढून टाकल्याचे आढळल्यास अशा दोषी ग्राहकांविरुद्ध पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करण्यात येईल, असेही या बैठकीत ठरविण्यात आले.
सार्वजनिक विहिरींची स्वच्छता
शहरातील सार्वजनिक विहिरींची स्वच्छता आणि सौर पंपांची स्थापना करून लघु पाणीपुरवठा योजनासुरू करण्याची सूचना यावेळी करण्यात आली. जलाशयांमधून होणारा पाण्याचा वापर कमी करण्यासाठी, सध्याच्या विहिरींची प्रयोगशाळेत पाण्याची गुणवत्ता तपासून स्वच्छ करून एमईडीए (MEDA) च्या मदतीने सौर पंप बसविणे आणि लघु पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे प्रस्तावित आहे. अशा योजनांमधून मिळणारे पाणी वाहनांची धुलाई, बागकाम इत्यादी पिण्या व्यतिरिक्त इतर कामांसाठी वापरता येईल.
भूजल पुनर्भरण
भूजल सर्वेक्षण प्राधिकरणातर्फे (GSDA) च्या मार्गदर्शनाखाली कोरडया पडलेल्या सार्वजनिक विहिरींमध्ये बोअर करुन विहिरींचा वापर करणे, जास्तीत जास्त पुनर्भरण (Rain Water Harvesting) संरचना निर्माण करणे, बोअरवेलचे पुनरुज्जीवन करणे इत्यादी कामे करण्यात येतील.
विकेंद्रित एसटीपी (STPs)
योग्य ठिकाणी विकेंद्रित सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) उभारण्याचे काम करण्यात येईल, जेणेकरून प्रक्रिया केलेले पाणी उद्याने, दुभाजकांमधील वृक्षारोपण, बांधकामाची कामे इत्यादींसाठी वापरता येईल.
गैरवापर करणाऱ्यांवर दंड
पिण्याच्या पाण्याचा वापर कार धुण्यासाठी, रस्ते धुण्यासाठी, बागकामासाठी, बांधकामाच्या कामांसाठी करताना आढळल्यास प्रत्येक घटनेसाठी रु. ५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याचे यावेळी सुचविण्यात आले.
गळतीची तात्काळ दुरुस्ती
शहरातील जलवाहिन्यांमधून होणारी गळती तात्काळ दुरुस्त करण्याचे यावेळी महापौरांनी अधिकाऱ्यांना दिले.
पाण्याचा जपून वापर करा
नागरिकांना संभाव्य पाणी टंचाईची परिस्थिती लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा गैरवापर टाळावा, पाणी जपून वा
परावे असे आवाहन महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी केले आहे.








