किशोर साहू, मौदा :- मौदा तालुक्यातील चाचेर – निमखेडा जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या गावा-गावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रशासकीय कार्यकीर्दीला पंचवीस पूर्ण झाल्याबद्दल माजी आमदार टेकचंद सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपा जिल्हा अध्यक्ष आनंदराव राऊत यांच्या नेतृत्वाखाली सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा रामटेक ( ग्रामीण) उपाध्यक्ष तथा निमखेडा – चाचेर जिल्हा परिषद सर्कलचे भाजपचे भावी उमेदवार संजू वाघमारे यांनी सांगितले.
वाघमारे यांनी पुढे सांगितले की,चाचेर – निमखेडा जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावातील अंगणवाडी सेविकांचे सन्मान करणे, अंगणवाडीतील मुलांना खाऊ वाटप, खेळण्याचे साहित्य वाटप करणे हे कार्यक्रम घेण्यात येत आहे. पक्षाने दिलेल्या कार्यक्रमाप्रमाणे गावात असलेल्या वाचनालयास पुस्तक भेट देणे, वृद्ध व्यक्तीची भेट घेऊन त्यांच्या सोबत स्नेहभोजन करणे, वृक्षारोपण, स्वास्थ कॅम्प भरविणे,आशीर्वादाचा दिवा प्रज्वलित करणे, रक्तदान व आरोग्य शिबीर घेणे, स्वच्छता अभियान या सारखे शिबीर भरवून नागरिकांना मदत करणे असे भरगच्च उपक्रम राबविण्यात येत आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या योजनेचा लाभार्थ्यांचे प्रत्यक्ष भेट घेवून सरकारच्या मिळणा-या लाभामध्ये काही अडचणी असल्यास शासन स्तरावर सोडविणे आणि सेवाज्योती यात्रेच्या माध्यमातून देशाबद्दल प्रेम वाढविणे. प्रत्येक धार्मिक मठ, मंदिर, मस्जिद अशा ठिकाणी जाऊन स्वच्छता करणे आदी उपक्रम १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर कालावधीत राबविण्यात येत आहेत.
या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास बरबटे , चाचेर मंडळ अध्यक्ष रवी चव्हाण , माजी पंचायत समिती उपाध्यक्ष खेमराज चाफले,महामंत्री चाचेर मंडळ कैलास सोमनाथे, मंगेश चाफले,किरण बरबटे, अशोक बावनकुळे, प्रल्हाद रंधाई, लिलाधर घाटबांधे , रजत महादुले, धनराज हरोडे, मोतीराम घरजाळे, कमलेश महादुले, उमेश शेंडे सह चाचेर – निमखेडा जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणारे भाजपा व भाजयूमो पदाधिकारी व कार्यकर्तेगण परिश्रम घेत आहेत.








