– श्रेय लाटण्यापेक्षा साकोली-लाखनीचा समावेश करा व जाहीर धान बोनस द्या; माजी आमदारांचा शासनावर घणाघात
हंसराज,भंडारा :- शासनाने जाहीर केलेल्या अतिरिक्त दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत तुमसर आणि मोहाडीचा समावेश हा सत्ताधाऱ्यांचा विजय नसून, तो केवळ रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांच्या लढ्याचा विजय आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्याचे श्रेय लाटण्याचा कोणीही केविलवाणा प्रयत्न करू नये, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे यांनी केला.
राज्य शासनाने सुरुवातीला भंडारा जिल्ह्यातील तुमसर, मोहाडी, साकोली आणि लाखनी हे तालुके दुष्काळ यादीतून वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप उसळला होता. शेतकऱ्यांनी आंदोलने केली, आदेशाची होळी केली आणि प्रशासनाला वास्तव दाखवून दिले. या संघर्षात राजेंद्र सपटे या शेतकऱ्याला प्राणही गमवावे लागले. मावा-तुडतुड्यांचा प्रादुर्भाव आणि पिकांच्या नासाडीचे वास्तव शेतकऱ्यांनी मांडल्यामुळेच शासनाला जाग येऊन तुमसर-मोहाडीचा समावेश करावा लागला.
या वेळी वाघमारे यांनी श्रेय घेणाऱ्यांना खडे बोल सुनावताना प्रश्न उपस्थित केला की, “मागणी करूनही साकोली आणि लाखनी तालुक्यांना दुष्काळग्रस्त यादीतून का वगळले? याचे उत्तर श्रेय घेणारे देतील का?”
तसेच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला धान उत्पादक शेतकऱ्यांचा बोनस अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा का झाला नाही, असा थेट सवालही त्यांनी केला. श्रेयवादाची नौटंकी करणाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बोनस विलंबाचीही जबाबदारी घ्यावी, असा टोला त्यांनी लगावला. शेतकऱ्यांच्या घामावर स्वतःच्या नावाची मोहर उमटवण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने मदत व बोनस जमा करावा, अशी आग्रही मागणी वाघमारे यांनी केली.








