– माजी आमदार चरण वाघमारे यांची राज्य शासनाकडे मागणी
हंसराज,भंडारा :- भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीत स्थलांतरित झाल्यापासून रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी येत असल्याचे माजी आमदार चरण सोविंदा वाघमारे यांनी म्हटले आहे. महाविद्यालयासाठी नवीन किंवा पर्यायी इमारत उपलब्ध करून सामान्य रुग्णालयाची इमारत रुग्णसेवेसाठी मोकळी करावी, अशी मागणी त्यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर वेळापत्रकानुसार उपलब्ध नसणे आणि आवश्यक वैद्यकीय सेवा वेळेत न मिळणे अशा तक्रारी रुग्ण, नातेवाईक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. यासंदर्भात विविध सामाजिक संघटना व लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली असून जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रारी करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातून येणाऱ्या गरीब रुग्णांना याचा अधिक त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले.
सामान्य रुग्णालयाची इमारत उपलब्ध झाल्यास जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नियंत्रणाखाली पूर्वीप्रमाणे स्वतंत्र प्रशासकीय व वैद्यकीय व्यवस्था सुरू ठेवता येईल, असे त्यांनी म्हटले आहे.
वाघमारे यांनी शासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत :
– जीएमसीसाठी स्वतंत्र नवीन इमारत उभारण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी.
– नवीन इमारत होईपर्यंत पर्यायी इमारतीत महाविद्यालय स्थलांतरित करावे.
– उपचारातील दिरंगाई व कथित अनियमिततेची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करावी.
– डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची नियमित तपासणी करावी.
– रुग्णांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करण्यासाठी यंत्रणा उभारावी.
– इमारत रुग्णसेवेसाठी उपलब्ध करण्याचा कालबद्ध कृती आराखडा जाहीर करावा.








