spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आता लालपरी घडवणार अयोध्येचे दर्शन

भंडारा :- अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्याची इच्छा असलेल्या भाविकांसाठी आता लालपरीच्या माध्यमातून थेट अयोध्येपर्यंत जाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. खासगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेत एसटी महामंडळाच्या माध्यमातून सामूहिक तीर्थयात्रेचे नियोजन करण्याची संधी भाविकांना मिळणार आहे. किमान ४० प्रवाशांचा समूह एकत्र आल्यास अयोध्येसाठी स्वतंत्र बस (लालपरी) आरक्षित करता येणार आहे. विशेष म्हणजे, केवळ अयोध्याच नव्हे, तर प्रवासादरम्यान जवळच्या धार्मिक स्थळांनाही भेट देण्याचे नियोजन करता येणार आहे. प्रवासाचे दिवस, मार्ग आणि थांबे यानुसार खर्च निश्चित आहे.

विशेष ग्रुप बुकिंग सेवा सुरू

बुकिंगसाठी जवळच्या एसटी बसस्थानक किंवा आगार व्यवस्थापकांकडे अर्ज करावा लागेल. शहरातून आता थेट अयोध्येसाठी एसटी बस बुकिंगसाठी जवळच्या एसटी बस स्थानक किंवा आगार व्यवस्थापकांकडे अर्ज करावा लागेल. स्थानिक एसटी आगारातून आता थेट उत्तर प्रदेशातील अयोध्येसाठी लालपरी रवाना होऊ शकते. खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानी भाड्याला आणि त्रासाला पर्याय म्हणून एसटी महामंडळाने ही विशेष ग्रुप बुकिंग सेवा सुरू केली आहे. यामुळे स्थानिक भाविकांना आपल्याच गावातून किंवा शहरातून थेट अयोध्येपर्यंतचा प्रवास सुखकर करता येणार आहे.

राहण्याची व जेवण्याची सोय ?

ही विशेष बस बुक करण्यासाठी किमान ४० प्रवाशांचा गट (ग्रुप) असणे आवश्यक आहे. संपूर्ण बसचे भाडे या गटाला एकत्रितपणे भरावे लागते. महामंडळ केवळ बस आणि चालकाची (ड्रायव्हर) सुविधा उपलब्ध करून देते; त्यामुळे प्रवासादरम्यान मुक्काम अन् जेवणाची सोय भाविकांना स्वतः किंवा टूर आयोजकांना करावी लागणार आहे.

अयोध्येसह जवळपासच्या स्थळांचेही दर्शन

या प्रासंगिक करारांतर्गत केवळ अयोध्याच नव्हे, तर प्रवाशांच्या इच्छेनुसार मार्गावरील किंवा परिसरातील काशी विश्वनाथ (वाराणसी), प्रयागराज (त्रिवेणी संगम), चित्रकूट आणि इतर प्रमुख धार्मिक/पर्यटन स्थळांचे दर्शन घेता येईल. भाविक स्वतःचा दौरा आणि भेटीची ठिकाणे निश्चित करू शकतात.

भाडेदर काय, प्रतिप्रवासी किती खर्च ?

एसटी महामंडळाच्या नियमानुसार किलोमीटरवर आधारित दर आकारले जातात. साध्या (लालपरी) बससाठी प्रति किलोमीटर निश्चित दर ठरलेला आहे. भाविकांच्या मागणीनुसार साधी ‘लालपरी’ उपलब्धतेनुसार टूरसाठी राहणार आहे. महाराष्ट्रातून अयोध्येचा प्रवास, दर्शन आणि परतीचा प्रवास साधारणपणे ५ ते ७ दिवसांचा प्लॅन केला जातो. प्रवाशांच्या गरजेनुसार टूरचे दिवस कमी-अधिक करण्याची मुभा महामंडळाने दिली आहे.

एसटी महामंडळाची ही सेवा केवळ अयोध्येपुरती मर्यादित नसून, भारतातील इतर कोणत्याही राज्यातील तीर्थक्षेत्रांसाठी आहे. यासाठी माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.

Popular Articles