किशोर साहू, मौदा :- शनिवार (ता.१४ नोव्हेंबर)ला दुपारी तीन वाजता दरम्यान भंडारा येथून अरोली कडे जाणाऱ्या रामटेक- भंडारा या महामार्गावर स्थित वाकेश्वर फाटा येथील बस स्थानकात भंडारा येथे जाण्यासाठी उभ्या असलेल्या रंजू चावके (४५) या विधवा महिलेला चिरडल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तिच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी विवाहित असून एक मुलगी अविवाहित आहे, असे वाकेश्वर येथील नागरिकांनी सांगितले. दिवाळीच्या पांडव पंचमीच्या दिवशी घडलेल्या घटनेने चावके परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला असल्याने वाकेश्वर परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, वाकेश्वर टोली येथील गृहस्थ दसाराम गुडेवार( ८३) यांच्या वृद्धापकाळाने निधन झाल्याने मयतीच्या कार्यक्रमासाठी त्यांची तुमसर येथील नातेवाईक रंजू चावके आली होती. मयतीच्या कार्यक्रम आटोपल्यानंतर भंडाऱ्यावरून तुमसरला एसटी महामंडळाच्या बसने जाण्यासाठी आज शनिवार दुपारी तीनच्या दरम्यान वाकेश्वर फाटा येथील बस स्थानकात उभी होती. त्यादरम्यान अरोली येथील भाजीपाला व्यावसायिक अविवाहित युवक अमोल पानतावणे (२३) भंडाऱ्यावरून अरोलीकडे तर ईजनी येथील दोन युवक त्यांच्या दुचाकीने ईजनी वरून वाकेश्वरला आले व अरोलीकडे जाण्यासाठी वळले असता एका युवकाची दुचाकी मेटॅडोच्या मरगडमध्ये फसल्याने मेटाडोर चालकाच्या स्टेरिंग हँग झाला. त्यामुळे चालक पानतावणे याच्या मोटाडोर वरील नियंत्रण सुटल्याने मेटाडोरने तेथे उभे असलेल्या महिला चिरडत नेले असे तेथे उपस्थितांनी सांगितले व तसा घटनेच्या व्हिडिओ समाज माध्यमांवर वायरल करण्यात आला.
अरोली पोलिसांच्या ताफा घटनास्थळी लगेच दाखल झाला व घटनास्थळी मृत्यू पावलेल्या महिलेला त्यांनी रामटेक येथे शवविच्छेदनासाठी नेले असून आरोपी चालक अमोल पाणतावणे याला अटक केलेली आहे. याबाबत अरोली थानेदार सागर गोमासे यांना सायं.७:४५ वाजता सदर घटनेबाबत विचारपूस करण्यासाठी भ्रमणध्वनी केले असता त्यांनी एफआयआर ची प्रक्रिया सुरू असून अर्ध्या तासात पूर्ण झाली की मी तुम्हाला कळवितो असे सांगितले. मात्र रात्री नऊच्या दरम्यान बातमी लिहीपर्यंत त्यांच्याकडून माहिती मिळालेली नाही.






