हंसराज,भंडारा :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाबाबत गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरण सोविंदा वाघमारे यांनी केले आहे. माध्यमांतील अशा बातम्यांमुळे पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकांमध्ये कोणताही संभ्रम किंवा गैरसमज निर्माण होऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
वाघमारे यांनी सांगितले की, विलीनीकरणाच्या मुद्द्यावर खासदार शरदचंद्र पवार यांनी यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनीही या विषयावर स्पष्ट मत मांडले आहे. त्यामुळे माध्यमांमधील उलटसुलट चर्चांना अनावश्यक महत्त्व देण्याची गरज नाही. पक्षाचे नेतृत्व, विचारधारा आणि राजकीय भूमिका यांबाबत कोणताही संभ्रम नसल्याचे त्यांनी नमूद केले.
पक्षाची भूमिका मांडताना वाघमारे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा एनडीएशी कोणताही संबंध जोडण्याचा प्रश्नच नाही. अजित पवार गटाला विलीनीकरणाची इच्छा असेल, तर त्यांनी एनडीएपासून वेगळी भूमिका घेत विलीनीकरणाचा प्रस्ताव मांडावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
माध्यमांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक बातमीवर प्रतिक्रिया देत बसण्यापेक्षा कार्यकर्त्यांनी पक्षसंघटन मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन वाघमारे
यांनी केले आहे. जनतेचे प्रश्न, शेतकरी, शेतमजूर, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य देऊन शरदचंद्र पवार यांचे विचार व पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवावी. विलीनीकरणाच्या चर्चेच्या नावाखाली संभ्रम निर्माण होऊ देऊ नये, तसेच अफवांना आणि कोणाच्याही दिशाभुलीला बळी पडू नये. पक्षाच्या विचारांशी व नेतृत्वाशी निष्ठा ठेवून सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, पक्षप्रेमी आणि समर्थकांनी एकजुटीने पक्षवाढीसाठी कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.






