– ओपीडी ३०० वरून १०० च्या खाली; तीन महिन्यांपासून रक्त तपासणी बंद, एक्स-रे विभागात सहाय्यकाचे पद रिक्त
पाटणसावंगी :- परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने पाटणसावंगी येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात आले. मात्र, या रुग्णालयातील आरोग्य सुविधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकेकाळी दररोज सुमारे ३०० रुग्णांची ओपीडी असलेल्या रुग्णालयात आता बाह्यरुग्णांची संख्या १०० पेक्षाही कमी झाली आहे. सध्या रुग्णालयात केवळ तीन महिला रुग्ण भरती असल्याची माहिती आहे. मागील तीन महिन्यांपासून रक्त तपासणीची सुविधा बंद असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.
तीन महिन्यांपासून रक्त तपासणी बंद!
ग्रामीण रुग्णालयात रक्त तपासणीची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना तपासणीसाठी सुमारे १३ किलोमीटर अंतरावरील सावनेर येथील ग्रामीण प्रशिक्षण केंद्रात जावे लागत आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र एकाच इमारतीत आहेत. ग्रामीण रुग्णालय सुरू होण्यापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत रक्त तपासणी केली जात होती. मात्र, सध्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा बाह्यरुग्ण विभागही बंद असल्याचे सांगण्यात येते.
नागपूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ऑगस्ट २०२६ पासून महा लॅब/एचएलएलमार्फत होणाऱ्या रक्त तपासणीबाबत शासनस्तरावर निर्णय झाल्याचे सांगितले जाते. मात्र, जिल्ह्यातील इतर ग्रामीण रुग्णालयांमध्ये रक्त तपासणी सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मग पाटणसावंगी ग्रामीण रुग्णालयातच रक्त तपासणी का बंद आहे? स्थानिक आरोग्य प्रशासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली आहे का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
ओपीडी ३०० वरून १०० च्या खाली!
ग्रामीण रुग्णालय सुरू झाल्यानंतर दररोज सुमारे ३०० रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येत होते. मात्र, आता ही संख्या १०० पेक्षाही कमी झाल्याचे सांगण्यात येते. ३० खाटांच्या रुग्णालयात सध्या केवळ तीन महिला रुग्ण भरती असल्याची माहिती आहे. ओपीडीतील रुग्णसंख्या घटण्यामागील नेमकी कारणे काय आहेत? रुग्णालयातील सुविधांचा अभाव याला कारणीभूत आहे का? याची आरोग्य विभागाने चौकशी करण्याची गरज आहे.
एक्स-रे विभागात सहाय्यकाचे पद रिक्त
रुग्णालयात एक्स-रे मशीन उपलब्ध असून एक्स-रे तंत्रज्ञही कार्यरत आहे. मात्र, एक्स-रे विभागातील सहाय्यकाचे पद रिक्त असल्याची माहिती आहे. तंत्रज्ञ रजेवर गेल्यास इतर कर्मचाऱ्यांकडून एक्स-रे काढले जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना यासाठी आवश्यक प्रशिक्षण व अनुभव आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी
३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय असूनही रक्त तपासणीसारखी मूलभूत सुविधा बंद असणे, ओपीडीतील रुग्णसंख्या घटणे आणि एक्स-रे विभागातील रिक्त पद या बाबींची वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करून बंद असलेली रक्त तपासणी सुविधा तातडीने सुरू करावी, एक्स-रे विभागातील रिक्त पद भरावे आणि रुग्णांना आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, यासाठी आरोग्य प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.






