spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

‘वो अंगारों पर लेटा है, अपना भारत देश!’

– कन्हानमध्ये रंगले अखिल भारतीय हास्य कविसंमेलन

कन्हान, प्रतिनिधी :-“वो अंगारों पर लेटा है, अपना भारत देश… अंधेर मचा है गली-गली, अंधियारा परिवेश!” ज्येष्ठ हास्य-व्यंग्य व ओजस्वी कवी तसेच संपादक सुदर्शन चक्रधर यांच्या या ज्वलंत काव्यपंक्तींनी उपस्थित श्रोत्यांना देशातील सद्यःस्थितीचे वास्तव दर्शन घडविले. त्यांच्या प्रभावी सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. निमित्त होते भीम महोत्सवांतर्गत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला समर्पित कन्हान येथे आयोजित अखिल भारतीय हास्य कविसंमेलनाचे. रिपब्लिकन सांस्कृतिक संघाच्या वतीने रविवारी सायंकाळी आंबेडकर चौकात आयोजित हे कविसंमेलन रात्री 12 वाजेपर्यंत हास्य, विनोद, व्यंग्य आणि काव्याच्या रंगात रंगले. राष्ट्रीय कवयित्री मंजुश्री पुष्प कारेमोरे यांच्या संयोजनाखाली पार पडलेल्या या संमेलनात देशाच्या विविध भागांतून आलेल्या नामवंत कवींनी आपल्या बहारदार रचनांमधून रसिकांना हास्य, व्यंग्य, शृंगार आणि ओजस्वी कवितांची मेजवानी दिली.

नागपूरचे प्रसिद्ध गझलकार शादाब अंजुम यांनी आपल्या व्यंग्यात्मक गझलांमधून श्रोत्यांना मनमुराद हसविले. बालाघाटचे हास्यकवी व गीतकार गोविंद ‘गांवठी’ यांनी आपल्या गीतांनी संमेलनात रंग भरला. डोंगरिया (बालाघाट) येथील हास्यकवी लक्ष्मीचंद ठाकरे यांनी ओपनिंग बॅट्समनची भूमिका चोख बजावत आपल्या सादरीकरणाने वातावरण निर्मिती केली. शृंगाररसाच्या कवयित्री मंजुश्री पुष्प कारेमोरे यांनी आपल्या भावपूर्ण काव्यरचनांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. प्रत्येक कवीच्या सरस रचनेला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि हास्याच्या गजरात उत्स्फूर्त दाद दिली. भोपाळ (सिहोर) येथून आलेले प्रसिद्ध प्रबोधनकार व हास्य-व्यंग्यकवी शैलेश ‘शैल’ यांनी आपल्या प्रभावी आणि खुमासदार शैलीत संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन केले. यासोबतच आपल्या भीमगीतांच्या सादरीकरणातून त्यांनी कार्यक्रमाला वेगळी उंची प्राप्त करून दिली. रात्री उशिरापर्यंत रसिकांची उपस्थिती आणि उत्स्फूर्त प्रतिसाद हे या कविसंमेलनाचे विशेष आकर्षण ठरले.

हे ठरले कार्यक्रमाच्या यशाचे शिलेदार!

भीम महोत्सवाचे आयोजक तथा रिपब्लिकन सांस्कृतिक संघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर भीमटे यांनी आभार प्रदर्शन केले. समाजप्रबोधन आणि जनजागृतीचा संदेश देणारे असे उपक्रम वारंवार आयोजित करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रशेखर भीमटे यांच्यासह नितीन मेश्राम, रोहित मानवटकर, संजय चहांदे, शनी खोबरागडे, संदीप शेंडे, मनोज गोंडाणे, नयन खोबरागडे, अखिलेश मेश्राम, नरेश चिमनकर, संजय गजभिये आदींनी अथक परिश्रम घेतले.

Popular Articles