– वारसा सांगण्यापेक्षा स्वतःचे नेतृत्व सिद्ध करण्याचा सल्ला; राजकीय दिवाळखोरीचा आरोप
नागपूर :- रोहित पवार यांच्या अलीकडील राजकीय भूमिकेवरून भाजपचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी अजितदादांच्या नावाचा आधार घेऊन सातत्याने आरोप-प्रत्यारोप करण्याचा प्रयत्न रोहित पवार करत असल्याचे सांगत, आज त्यांच्या राजकीय परिपक्वतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याची टीका आमदार डॉ. फुके यांनी केली.
अजितदादांच्या दुर्दैवी निधनानंतर रोहित पवार सातत्याने पत्रकार परिषदा, व्हिडिओ कॉन्फरन्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध आरोप करत आहेत. मात्र, या संपूर्ण प्रकारातून अजितदादांची राजकीय जागा मिळवण्याचा आणि स्वतःला त्यांचे राजकीय वारसदार म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. एखाद्याच्या दुःखाचे आणि भावनांचे राजकीय भांडवल करणे हा अत्यंत दुर्दैवी प्रकार असल्याचे डॉ. फुके यांनी म्हटले.
एकेकाळी रोहित पवार यांच्याकडे महाराष्ट्रातील तरुणांचे आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून पाहिले जात होते. मात्र, सध्या ते ज्या पद्धतीने आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण करत आहेत, ते पाहता त्यांच्या राजकीय परिपक्वतेवर प्रश्न निर्माण होतात. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील निर्णयप्रक्रियेत त्यांना अपेक्षित स्थान मिळत नसल्याने त्यांची राजकीय अस्वस्थता वाढली आहे का? तसेच ते काँग्रेसच्या वाटेवर आहेत का? असे प्रश्नही उपस्थित होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
राजकीय महत्त्वाकांक्षा असणे चुकीचे नाही; मात्र स्वतःचे नेतृत्व सिद्ध करण्यासाठी दुसऱ्याच्या राजकीय वारशाचा आधार घेणे आणि सातत्याने आरोपांच्या माध्यमातून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणे योग्य नाही. राजकीय नेतृत्व हे कामातून, विचारांतून आणि जनतेच्या विश्वासातून सिद्ध करायचे असते; केवळ पत्रकार परिषदा आणि सोशल मीडिया पोस्टमधून नाही.
रोहित पवार इतक्या खालच्या पातळीवर जाऊन राजकीय टीका करतील, अशी अपेक्षा नव्हती. स्वतःचे राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी अजितदादांच्या नावाचा वारंवार वापर करण्याचा हा प्रयत्न त्यांच्या राजकीय प्रतिमेला धक्का पोहोचवणारा आहे. आज रोहित पवारांच्या या भूमिकेतून त्यांच्या राजकीय दिवाळखोरीचे दर्शन संपूर्ण महाराष्ट्राला झाले आहे, अशा शब्दांत आमदार डॉ. परिणय फुके यांनी रोहित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला.






