– तक्रार अर्जाची दखल घेत भंडारा गट विकास अधिकाऱ्यांचे आदेश;
हंसराज,भंडारा :- भंडारा तालुक्यातील गट ग्रामपंचायत उमरी येथे दि. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी होणारी कायमस्वरूपी शिपाई पदाची भरती परीक्षा तात्काळ स्थगित करण्याचे निर्देश भंडारा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रमोद हूमणे यांनी दिले आहेत. यासंदर्भात पंचायत समिती कार्यालयाने दि. १६ नोव्हेंबर रोजी (पत्र क्र. पंसभ/पंचा/विअ//2026/3007) ग्रामपंचायत उमरीचे प्रशासक व ग्रामपंचायत अधिकारी यांना अधिकृत पत्र जारी केले आहे.
शासकीय पत्रात नमूद केल्यानुसार, उमरी येथील सचिन बाबुलाल गेडाम व इतर ८ जणांनी दि. १६ नोव्हेंबर रोजी या भरती प्रक्रियेबाबत तक्रार अर्ज दाखल केला होता. पत्रातील नोंदीनुसार, दि. ९ सप्टेंबर रोजी प्रशासकाची नियुक्ती झाल्यानंतर दि. १८ सप्टेंबर रोजी केवळ प्रशासक व ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत झालेल्या मासिक सभेत शिपाई भरतीचा ठराव घेण्यात आला. तसेच, डिसेंबर २०२५ मध्ये तत्कालीन लोकनियुक्त ग्रामपंचायतीने रोजंदारीवर नेमलेल्या तात्पुरत्या कर्मचाऱ्याला कोणत्या कारणामुळे, आदेशाने व नियमाखाली कामावरून कमी करण्यात आले, याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे गट विकास अधिकाऱ्यांनी पत्रात म्हटले आहे.
यासोबतच, भरतीची जाहिरात दि. २२ सप्टेंबर रोजी सूचना फलकावर व स्थानिक व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रसिद्ध झाली आणि त्याच दिवशी नागपूर पदवीधर मतदारसंघाची आदर्श आचारसंहिता लागू झाली होती, असा मुद्दा तक्रार अर्जात मांडण्यात आला आहे. आचारसंहिता काळात २७ अर्ज स्वीकारून प्रक्रिया पुढे नेण्यासाठी सक्षम निवडणूक प्राधिकरणाची परवानगी घेतली होती का, असा प्रश्न तक्रारदारांनी उपस्थित केला आहे. या सर्व बाबींची दखल घेत, आदर्श आचारसंहिता भंग होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने दि. १७ नोव्हेंबरची परीक्षा तात्काळ स्थगित करण्यात यावी, असे आदेश गट विकास अधिकाऱ्यांनी पत्राद्वारे दिले आहेत.






