– रब्बी हंगामासाठी पात्र शेतकऱ्यांना १०० टक्के पीककर्ज वाटपाचे बँकांना निर्देश; प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे आदेश
हंसराज, भंडारा :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत २३ हजार ६५८ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. रब्बी हंगामासाठी कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या तसेच कर्जप्रस्ताव प्राप्त झालेल्या पात्र शेतकऱ्यांना प्राधान्याने १०० टक्के पीककर्ज उपलब्ध करून द्यावे. तसेच कर्जवाटपाची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी बँकांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत आयोजित तक्रार निवारण सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा उपनिबंधक विलास देशपांडे, अग्रणी बँक व्यवस्थापक अण्णा ठाकरे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयीकृत बँका आणि ग्रामीण बँकांमार्फत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत कोणताही पात्र शेतकरी कर्जापासून वंचित राहू नये, यासाठी बँकांनी कर्जवाटप आणि ई-केवायसी प्रक्रियेला गती द्यावी. तसेच प्रत्येक शुक्रवारी कर्जवाटप व ई-केवायसीचा अद्ययावत अहवाल अग्रणी जिल्हा व्यवस्थापकांकडे (एलडीएम) सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
वनपट्टाधारक शेतकऱ्यांना वनपट्टा जमिनीची ॲग्री स्टॅक (Agri-Stack) नोंदणी करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अशा प्रकरणांची समितीमार्फत विशेष छाननी करून अहवाल मंजूर करावा आणि संबंधित बँक शाखांमार्फत पात्र शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, असेही निर्देश देण्यात आले.
योजनेचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी बँकांनी ई-केवायसीबाबत व्यापक जनजागृती करावी. शेतकऱ्यांनीही आवश्यक कागदपत्रांसह वेळेत अर्ज सादर करून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.






