किशोर साहू, मौदा :- जिल्हा हिवताप अधिकारी नागपूर डॉ. अदिती त्याडी यांच्या आदेशानुसार कोदामेंढी येथे दोन दिवसीय रात्रकालीन हत्तीरोग सर्वेक्षणाकरिता आरोग्य विभागाचे आरोग्य कर्मचारी २० वर्षावरील नागरिकांचे रक्ताचे नमुने सोमवार (ता. १६ नोव्हेंबर ) ला रात्री ९:३० वाजता पासून घेण्यास सुरुवात केलेली आहे. उद्या मंगळवार (ता. १७) नोव्हेंबरला हे अभियान सुरू राहणार आहे.
कोदामेंढी येथे एकूण ३ पथक असून प्रत्येक पथकाला ५० नागरिकांचे असे एकूण दर दिवशी १५० नागरिकांचे रक्ताचे नमुने गोळा करायचे आहेत. वार्ड क्रं.३ येथील पथकात भिवापूर येथील फायलेरिया क्लिनिकचे फायलेरिया क्षेत्र कार्यकर्ता सुरज कुंभरे, कोदामेंढी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येत असलेल्या धानोली उपकेंद्रातील आरोग्य सेवक मधुकर राऊत यांच्या समावेश असून ते नागरिकांना झोपेतून उठवून रक्ताचे नमुने गोळा करीत आहेत. फायलेरियाचे जंत हे रात्रीला सक्रिय होत असल्याने हे रक्ताचे नमुने रात्री ९:३० वाजता पासूनच गोळा करावे लागतात असे ते नागरिकांना सांगत आहेत, त्यामुळे हे रक्ताचे नमुने दिवसा गोळा करत नाहीत. कोदामेंढी येथे दोन रुग्ण फायलेरियाने ग्रस्त असल्याचे राऊत यांनी सांगितले. फायलेरिया मुक्त गाव करण्यासाठी शासनाचा आरोग्य विभाग हे अभियान रात्रीला राबवीत असल्याचे, आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगितले. प्रत्येक गावातील सरपंच व पोलीस पाटलांनी रात्रीला रक्ताचे नमुने गोळा करणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या पथकाला सहकार्य करण्यासाठी आरोग्य विभागाकडून तसे पत्रही देण्यात आले आहे.






