हंसराज, भंडारा :- न्यायालयात दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली तसेच न्यायालयाबाहेर असणारी धनादेश अनादराची (चेक बाऊन्स) प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यासाठी भंडारा जिल्ह्यात शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व तालुका स्तरावर या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे. धनादेश अनादरासंदर्भातील प्रकरणांचा परस्पर संमतीने जलद निपटारा व्हावा, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
विशेष लोकअदालतीमध्ये दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने प्रकरणे सामोपचाराने निकाली काढली जातात. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत लागणारा वेळ आणि खर्च वाचण्यास मदत होते. तसेच पक्षकारांचा मानसिक ताण कमी होऊन आर्थिक वादही सौहार्दपूर्ण वातावरणात मिटविण्याची संधी उपलब्ध होते.
ही विशेष लोकअदालत जिल्हा न्यायालय, भंडारा तसेच जिल्ह्यातील अधिनस्त सर्व तालुका दिवाणी व फौजदारी न्यायालयांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये प्रलंबित असलेल्या धनादेश अनादराच्या प्रकरणांतील पक्षकारांना आपले वाद परस्पर संमतीने मिटविता येणार आहेत.
तरी संबंधित प्रकरणांतील पक्षकारांनी मोठ्या संख्येने विशेष लोकअदालतीमध्ये सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा यांनी केले आहे.






