विनापरवाना दारू वाहतूक; आरोपी पसार, गुन्हा नोंद
खापा, १८ – खापा पोलीस स्टेशन हद्दीतील उमरी शिवार येथे पोलिसांनी सापळा रचून विदेशी दारूची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडले. या कारवाईत तब्बल १६ लाख ९९ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र, चालकाने वाहन सोडून पलायन केले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी (दि.१७) खापा पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मध्यप्रदेशातून सिंदेवाणीमार्गे खापा येथे चारचाकी वाहनाने अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक केली जात आहे. यावरून ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर भुजाडे यांच्या मार्गदर्शनाखाली फॉरेस्ट नाका खापा येथे नाकाबंदी करण्यात आली.
नाकाबंदी दरम्यान वाहनचालकाला थांबविण्याचा इशारा दिला असता, त्याने गाडी वळवून उमरी गावाच्या दिशेने पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करताच आरोपीने वाहन नाल्याजवळ सोडून झुडपात पसार झाला. शोध घेऊनही तो सापडला नाही.
घटनास्थळावरून पांढऱ्या रंगाची महिंद्रा एक्सयूव्ही ७०० (MH 49 CQ 7786) किंमत रु १५,००,००० तसेच रॉयल स्टॅग सुपेरियर व्हिस्कीच्या १६ पेट्या (एकूण ७६८ निपा, किंमत रु १,९९,६८०) असा एकूण रु १६,९९,६८० किमतीचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला.
चालक/मालकाविरुद्ध खापा पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई ठाणेदार एपीआय किशोर भुजाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपनि. नारायण बोरकर, पोलिस शिपाई राहुल रेवतकर, पन्ना बटाउवाले, परवेज शेख आणि अमृत किनगे यांनी केली.








