कर्मचारी हजर अधिकारी गैरहजर; कार्यवाही होणार काय?
संदीप बलवीर, टाकळघाट १८ : भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्धापन दिनी देशभरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांत सकाळी ध्वजारोहण सोहळे उत्साहात पार पडले. मात्र, टाकळघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात मात्र ध्वजारोहण कार्यक्रमास ‘तिलांजली’ देण्यात आली. ध्वजवंदनासाठी कर्मचारी हजर असताना येथील दोन्ही वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याचे समोर आले असून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा उघड
आरोग्यसेवक एस.एस. सावरकर, एन. वाघमारे, स्टाफ नर्स किरण मेंढे, कृतिका गावंडे व आश्लेषा रामटेके ध्वजारोहणासाठी सकाळी हजर होते. परंतु प्रथम वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा वंजारी व दुय्यम वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजस्विनी गोतमारे या अनुपस्थित असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्रपाळीवर असलेल्या डॉ. गोतमारे या सकाळी ८.३० वाजता कुटुंबीयांच्या कारणास्तव रुग्णालयातून निघून गेल्या. तर डॉ. वंजारी या सकाळी ९.३० वाजेपर्यंत केंद्रावर हजर नव्हत्या. अशा परिस्थितीत कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्याने मुख्यालय कसे सोडले? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
- डॉ. तेजस्विनी गोतमारे (दुय्यम वैद्यकीय अधिकारी): “मी सतत ४८ तास ड्युटी केल्याने खूप थकले होते. कुटुंबाकडेही लक्ष द्यावे लागते. म्हणून मी डॉ. वंजारी यांना कळवून सकाळी ८.३० वाजता हॉस्पिटलमधून निघाले.”
- डॉ. प्रज्ञा वंजारी (प्रथम वैद्यकीय अधिकारी): “आमच्या दवाखान्याची इमारत सध्या बांधकामाधीन आहे. त्यामुळे ध्वजारोहण कार्यक्रमासाठी योग्य जागा उपलब्ध नसल्याने ध्वजारोहण घेता आले नाही.”
तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पाडवे (हिंगणा) यांनी सांगितले की, “टाकळघाटसह तालुक्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारती बांधकामाधीन आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून तेथे ध्वजारोहण होत नाही. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी कर्तव्य कसोशीने पार पाडले असेल तर त्यांच्यावर कार्यवाही होणार नाही.”
नागरिकांमध्ये संताप
दरम्यान, देशभरात ‘हर घर तिरंगा’ मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांना राष्ट्रध्वजाशी भावनिक नाते जोडण्याचे आवाहन होत असताना शासकीय आरोग्य केंद्रातील अधिकारीच अनुपस्थित राहणे हे ध्वजारोहणाच्या मूलभूत कर्तव्यालाच धक्का देणारे असल्याचे टाकळघाटकरांचे मत आहे.








