काटोल :- ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी चांगले रस्ते उपलब्ध व्हावेत, शेतीमालाची वाहतूक सुलभ व्हावी आणि ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था मजबूत व्हावी, या उद्देशाने आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या हस्ते नागपूर ग्रामीण तालुक्यातील विविध गावांमध्ये पांदण रस्त्यांच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (NMRDA) माध्यमातून सावंगा, शिवा, पांजरा, बाजारगाव, सातनवरी, मोहगाव, लिंगा (धामणा), धामणा (लिंगा), पेठ काळडोंगरी आणि व्याहाड या गावांमध्ये पांदण रस्त्यांच्या उपग्रेडेशनच्या एकूण ११ कामांचे भूमिपूजन आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
या सर्व कामांची एकूण लांबी १६.८५ किलोमीटर असून, या विकासकामांसाठी ३ कोटी १४ लाख ७८ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
यावेळी बोलताना आमदार चरणसिंग ठाकूर म्हणाले, “ग्रामीण भागाचा विकास हा आपल्या प्राधान्यक्रमाचा विषय आहे. शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी चांगले रस्ते उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे. पांदण रस्ते चांगले झाल्यास शेतमालाची वाहतूक सुलभ होईल, शेतीसाठी लागणारे साहित्य शेतापर्यंत पोहोचवणे सोपे होईल आणि शेतकऱ्यांचा वेळ व श्रम वाचतील. त्यामुळे ग्रामीण भागातील पांदण रस्त्यांच्या विकासाला आम्ही प्राधान्य देत आहोत.”
ते पुढे म्हणाले, “सावंगा, शिवा, पांजरा, बाजारगाव, सातनवरी, मोहगाव, लिंगा, धामणा, पेठ कालडोंगरी आणि व्याहाड या गावांतील १६.८५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांसाठी ३ कोटी १४ लाख रुपयांपेक्षा अधिक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या कामांचा दर्जा चांगला राखून ती वेळेत पूर्ण करण्यावर भर राहील. ग्रामीण भागातील शेतकरी आणि नागरिकांना अधिकाधिक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे.”
या पांदण रस्त्यांच्या कामांमुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतापर्यंत जाणे-येणे सुलभ होणार असून, शेतीमालाची वाहतूक, कृषी निविष्ठांची ने-आण तसेच पावसाळ्यात होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था सुधारण्यासोबतच शेतीच्या विकासालाही चालना मिळणार आहे.
ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास, शेतकऱ्यांचे हित आणि गावागावांत पायाभूत सुविधा निर्माण करणे हेच आपले ध्येय असून, विकासकामांच्या माध्यमातून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असा विश्वास आमदार चरणसिंग ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला.






