spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राज्यात फटाके विक्रीवरच बंदी घालावी लागेल

– दिवाळीतील नियमभंगावरून उच्च न्यायालयाचे तीव्र ताशेरे

 मुंबई :- फटाके फोडण्याबाबत दिलेल्या निर्देशांचे मुंबई आणि ठाणे महापालिका क्षेत्रांत सर्रास उल्लंघन झाले असून त्यामुळे हवेची गुणवत्ताही खालावली आहे. पालिका आणि पोलिस यंत्रणा यावर नियंत्रण ठेवण्यात असमर्थ ठरत असतील, तर राज्यातील शहरांमध्ये यापुढे फटाके विक्रीवरच बंदी घालावी लागेल, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी नोंदवले. या सर्व याचिकांवरील अंतिम निर्णय न्यायालयाने राखून ठेवला आहे.

आगीच्या ३३५ घटना; सणाऐवजी घरात दुःख

दिवाळीच्या दिवसांत ३३५ ठिकाणी फटाक्यांमुळे आगी लागल्या. लोकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. तर, काही ठिकाणी जीवितहानी झाली. दिवाळीचा सण साजरा होण्याऐवजी त्यांच्या घरात दुःख होते. दुसऱ्यांच्या जीवाच्या किमतीवर फटाके वाजवले. लोकांच्या या मानसिकतेला काय बोलायचे? न्यायालयाच्या आदेशांना धाब्यावर बसवून पहाटेपर्यंत फटाके वाजवले. लोक असे का वागत आहेत? न्यायालयाला हे सांगण्याची वेळ का येते? नागरिकांनी स्वत:च बदल घडवावा. इतक्या दुर्घटना घडूनही फटाक्यांचे उत्पादन करणारे किंवा नागरिक पुढाकार घेताना दिसत नाहीत, असे न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने म्हटले.

जीवाशी खेळून व्यवसाय करण्याचा अधिकार नाही

फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनी व वायू प्रदूषणाची गांभीर्याने दखल घेत न्यायालयाने स्वत:हून याचिका दाखल करून घेतली. काही फटाके विक्रेत्यांनीही न्यायालयात धाव घेतली. व्यवसाय करण्याच्या आपल्या अधिकारावर गदा येत असल्याचा त्यांनी युक्तिवाद केला. त्यावर न्यायालयाने त्यांना सुनावले. तुम्हाला व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. मात्र, नागरिकांच्या जीवाशी खेळ करून व्यवसाय करण्याचा अधिकार नाही. फटाक्यांमुळे प्रदूषण होते, जीवितहानी होते, हे मान्य करूनही तुम्हाला व्यवसाय करायचा आहे? असे न्यायालयाने म्हटले. मुंबई महापालिकेने आणि पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. पालिका आणि सरकार हतबल असेल तर राज्यातील शहरांमध्ये फटाके विक्री करण्यास बंदी घालावी लागेल, असे निरीक्षण नोंदवित न्यायालयाने या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला.

Popular Articles