– रहमतनगरात दोन युवक गंभीर भाजले
चंद्रपूर :- घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये अवैधरित्या गॅस भरताना झालेल्या भीषण स्फोटात दोन युवक गंभीररीत्या भाजल्याची घटना चंद्रपूर शहरातील रहमतनगर परिसरात घडली. गुरुवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दोन्ही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रहमतनगरातील मसीहा लॉन्सजवळ असलेल्या एका घरात गुरुवारी रात्री सुमारे ११.३० वाजताच्या सुमारास घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरण्याचे काम सुरू होते. यावेळी अचानक गॅसचा भडका उडून सिलेंडरचा जोरदार स्फोट झाला. काही क्षणांतच घरात आगीचे लोळ पसरले. या आगीच्या तडाख्यात तेथे उपस्थित असलेले दोन युवक गंभीररीत्या भाजले.
स्फोटाचा मोठा आवाज झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही जखमींना तातडीने चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. मात्र, भाजण्याचे प्रमाण अधिक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले.
अवैध रिफिलिंगमुळे नागरिकांची सुरक्षा धोक्यात
शहरातील दाट लोकवस्तीच्या भागात सुरू असलेल्या कथित अवैध गॅस रिफिलिंगच्या प्रकारामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा निष्काळजीपणामुळे केवळ संबंधित व्यक्तीच नव्हे, तर आजूबाजूच्या रहिवाशांचाही जीव धोक्यात येऊ शकतो. या घटनेनंतर अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.






