spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पेन्शनधारकांचे डिजिटल हयातीचे प्रमाणपत्र ३० नोव्हेंबरपूर्वी अपडेट करा 

हंसराज, भंडारा :- जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारकांनी आपले डिजिटल हयातीचे प्रमाणपत्र (Digital Life Certificate – DLC) ३० नोव्हेंबरपूर्वी अपडेट करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असून, सर्व बँकांनी या कामाला गती द्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी दिले.

जिल्हा कोषागार कार्यालयाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय परिषद कक्षामध्ये Digital life certificate campaign संदर्भात बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते.बैठकीला जिल्हा कोषागार अधिकारी सचिन मिलमिले,अप्पर कोषागार अधिकारी नितीन दानव तसेच संबंधित बँक व्यवस्थापक उपस्थित होते.

जिल्ह्याने किमान ५० टक्क्यांपेक्षा अधिक उद्दिष्ट गाठण्यासाठी बँकांनी समन्वयाने काम काम करावे‌, यापुढे निवृत्तीवेतनधारकांचे हयातीचे प्रमाणपत्र मॅन्युअल पद्धतीने स्वीकारले जाणार नसून, ते केवळ ‘जीवन प्रमाण पोर्टल’ आणि ‘आधार फेस आरडी’ ॲपच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीनेच अपडेट करणे बंधनकारक आहे. यापूर्वी मॅन्युअल पद्धतीने हयातीचा दाखला सादर केलेल्या निवृत्तीवेतनधारकांनीही नव्याने डिजिटल प्रमाणपत्र तयार करून घेणे आवश्यक आहे.

ही प्रक्रिया अत्यंत सोपी असून, बँकेतील संबंधित कर्मचाऱ्यांनी मोबाईलमध्ये जीवन प्रमाण आणि ॲप डाउनलोड करून नोंदणी करावी. त्यानंतर निवृत्तीवेतनधारकांचा आधार क्रमांक आणि चेहरा स्कॅन करून अवघ्या दोन मिनिटांत डिजिटल हयातीचे प्रमाणपत्र तयार करता येते.

दरम्यान, बँकांमधील कर्मचाऱ्यांनी या डिजिटल प्रक्रियेची माहिती व्हावी आणि तांत्रिक अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी कोषागार कार्यालयाच्या वतीने मार्गदर्शन करण्यात येत आहे. ज्या बँकांमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे किंवा तांत्रिक अडचणी येत आहेत, त्यांनी संबंधित निवृत्तीवेतनधारकांना कोषागार कार्यालयात पाठवावे. तेथे स्वतंत्र मदत कक्ष (हेल्प डेस्क) सुरू करण्यात आला आहे.निर्धारित मुदतीत सर्व निवृत्तीवेतनधारकांचे डिजिटल हयातीचे प्रमाणपत्र पूर्ण व्हावे, यासाठी बँका, कोषागार कार्यालय आणि निवृत्तीवेतनधारकांनी परस्पर समन्वय ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Popular Articles