spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

काटोल तालुकास्तरीय समन्वय व पुनर्विलोकन समितीची सभा संपन्न

काटोल :- काटोल येथे तालुकास्तरीय समन्वय व पुनर्विलोकन समितीची सभा पार पडली. या सभेत आमदार चरणसिंग ठाकूर यांनी विविध शासकीय विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. तसेच काटोल-नरखेड तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतकरी, पाणीपुरवठा, शेती आणि विविध शासकीय योजनांशी संबंधित प्रश्नांवर विशेष लक्ष केंद्रित केले.

यावेळी आमदार चरणसिंग ठाकूर म्हणाले की, काटोल – नरखेड परिसर दुष्काळाच्या संकटाचा सामना करीत असून, अशा परिस्थितीत उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे ही काळाची गरज आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून त्याचा काटकसरीने वापर करण्याची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे. आपल्या भागातील संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडू नयेत, यासाठी संत्रा बागांचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. संत्रा हे या भागातील शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून दुष्काळामुळे फळबागांचे नुकसान होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले. ठिबक सिंचनाचा जास्तीत जास्त वापर, शेततळ्यांमध्ये पाण्याची साठवणूक, बंधारे व तलावांतील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन, पावसाचे पाणी अडविणे तसेच पाण्याचा अपव्यय रोखणे यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. संत्रा बागांमध्ये झाडांच्या गरजेनुसार मर्यादित पाण्याचा योग्य वापर करून बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन व आवश्यक सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

काटोल तालुक्यातील प्रलंबित असलेले पट्टे वाटपाचे प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यात यावेत. अनेक लाभार्थी नागरिक व शेतकरी या प्रश्नामुळे प्रतीक्षेत असून, अधिकाऱ्यांनी प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश आमदार चरणसिंग ठाकूर यांनी दिले. पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन हा विषय प्राधान्याने निकाली काढावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून शेतकरी बांधवांना पाच हजार रुपय मदत करण्यात आली आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टी, दुष्काळ किंवा अन्य नैसर्गिक कारणांमुळे पीक व शेतीचे नुकसान झाले असून अद्याप पंचनामे झालेले नाहीत, अशा शेतकऱ्यांच्या शेतांचे तातडीने प्रत्यक्ष पंचनामे करण्यात यावेत. पात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे शासनाकडे त्वरित पाठवून त्यांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळवून देण्यासाठी विलंब न करता कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

सामाजिक वनीकरण विभागामार्फत करण्यात येणारे वृक्षारोपण योग्य नियोजन व नियमानुसार करण्यात यावे. केवळ झाडे लावण्यापुरते मर्यादित न राहता लावलेल्या झाडांचे योग्य संगोपन व संवर्धन होणे आवश्यक आहे. वृक्षारोपणासाठी योग्य ठिकाणांची निवड करून झाडे जगविण्यावर भर द्यावा, जेणेकरून या उपक्रमाचा पर्यावरणासह सर्वसामान्य नागरिकांना लाभ होईल. वृक्षारोपणाच्या कामात पारदर्शकता व गुणवत्तेला प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

दुष्काळाच्या या कठीण काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने केवळ कागदोपत्री नियोजन न करता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचून उपाययोजना कराव्यात. पाणी व्यवस्थापन, फळबागांचे संरक्षण, शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यासाठी विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश आमदार चरणसिंग ठाकूर यांनी दिले.

यावेळी समन्वय समितीचे अध्यक्ष दिनेश ठाकरे, उपविभागीय अधिकारी पियुष चीवंडे, तहसीलदार श्रीमती आभा बोरकर, मुख्याधिकरी धनंजय बोरीकर, पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाट,लता धारपुरे, भोंडे, ज्ञानेश्वर माळवी, शामराव तायवाडे तसेच अधिकारी, कर्मचारी व समितीचे सदस्य उपस्थित होते.

Popular Articles