राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानक प्राप्त युपीएचसी ना आयुक्तांनी केले सन्मानित स्वातंत्र्य दिनी मानेवाडा, नंदनवन, कपिल नगर यूपीएच चा सन्मान

0
63

नागपूर, ता. १९  : नागपूर महानगरपालिकेच्या मानेवाडा, नंदनवन आणि कपिल नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना (यूपीएचसी) राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानक (NQAS) प्राप्त झाले आहे. या उपलब्धीबद्दल मनपा मुख्यालयातील कार्यक्रमात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी तिनही नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या चमुंना सन्मानित केले.

मंचावर अतिरिक्त आयुक्त  वैष्णवी बी., अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, मुख्य अभियंता  मनोज तालेवार, उपायुक्त  विजया बनकर, उपायुक्त  मिलिंद मेश्राम, उपायुक्त गणेश राठोड, उपायुक्त राजेश भगत, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त अशोक गराटे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

२८ एप्रिल ते ३ मे दरम्यान नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र मानेवाडा, नंदनवन व कपिल नगर यांचे राष्ट्रीय मूल्यांकन राष्ट्रीय स्तरावरील मुल्यांकन अधिकारी यांचे द्वारे करण्यात आले होते. त्यात मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राला ८९.९५ टक्के व नंदनवन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राला ८८ टक्के गुण प्राप्त करून राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता आश्वासन मानक (NQAS) प्राप्त झाले होते.

नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र  कपिल नगर ९१.२४ टक्के गुण प्राप्त करून राष्ट्रीय स्तरावरील NQAS मानक प्राप्त झालेले आहे. विशेष म्हणजे, २०२३ मध्ये मनपाचे इंदोरा व शांतीनगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता आश्वासन मानक (NQAS) प्राप्त झालेले महाराष्ट्रातील पहिले केंद्र ठरले होते.

राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानक (NQAS) तपासणी सूची नुसार १२ थीमॅटिक एरिया नुसार अंमलबजावणी केली जाते. ज्यामध्ये माता व बाल संगोपन सेवा, बाह्यरुग्ण सेवा, लसीकरण, बाह्यसत्र, आपत्कालीन व ड्रेसिंग सेवा,  कुटुंब कल्याण,  प्रयोगशाळा, औषधी,  संसर्गजन्य रोग नियंत्रण तसेच असंसर्गजन्य रोग नियंत्रण आणि सामान्य प्रशासन (ज्यामध्ये ईमारत स्थिती, वस्त्र, आहार, रुग्ण कल्याण समिती इत्यादी) यांचे दिलेल्या पूर्वनिर्धारित निकषानुसार मूल्यांकन केले जाते.

NQAS मानक हे ३ वर्षाकरिता वैध आहे. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रतिवर्ष रक्कम दोन लक्ष रुपये अनुदान पारितोषिक म्हणून मिळेल. प्रथम वर्ष अनुदान हे निकालाच्या अनुषंगाने, द्वितीय व तृतीय वर्ष मध्ये राज्यस्तरीय पुनर्मुल्यांकन मध्ये उत्तीर्ण असल्यास देय राहील. सदर अनुदान हे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये रुग्णांना सेवा उपलब्ध करून देणेकरीता वापरण्यात येईल.

पुरस्कार विजेत्या कपिल नगर, मानेवाडा व नंदनवन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार व माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. सरला लाड यांचे मार्गदर्शन प्राप्त झाले. कपिल नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अरिष शायमा, मानेवाडा वैद्यकीय अधिकारी डॉ. मीनल पटले व नंदनवन वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रेयस खेमका यांच्या नेतृत्वात दोन्ही केंद्रामधील आरोग्य चमूने उत्कृष्ट कामगिरी बजावली.

शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अश्विनी निकम, शहर लेखा व्यवस्थापक  निलेश बाभरे, शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक डॉ. राजेश गं. बुरे, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक डॉ. शुभांगी कुंभारे,डॉ. चैती हटवार  आणि डॉ. दिव्या बनकर यांनी सर्व बाबींबाबत योग्य ते समन्वय व मार्गदर्शन यूपीएचसी ला दिले.