spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

‘ड्रॅगन पॅलेस टेम्पल’मुळे नागपूरची जागतिक स्तरावर ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

– ‘ड्रॅगन पॅलेस टेम्पल’चा वर्धापनदिन आणि महोत्सवाचे उद्घाटन

– भारत-जपानच्या सांस्कृतिक व धम्मविषयक संबंधांचा गौरव

नागपूर :- भगवान गौतम बुद्धांनी जगाला प्रज्ञा, करुणा आणि शील याचा संदेश दिला. त्यांच्या विचारांवर आधारित बौद्ध धम्म आज जगभर पोहोचला असून, जपानसह अनेक देशांमध्ये बौद्ध धर्माचे अनुयायी मोठ्या संख्येने आहेत. भारत आणि जपान यांच्यात राजकीय संबंधांसोबतच सांस्कृतिक आणि वैचारिक नातेदेखील दृढ आहे. नागपूरची पवित्र दीक्षाभूमी आणि ‘ड्रॅगन पॅलेस टेम्पल’मुळे शहराला जागतिक स्तरावर बौद्ध धम्माचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून ओळख मिळत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

कामठी येथील ‘ड्रॅगन पॅलेस टेम्पल’ परिसरात २७ वा वर्धापन दिन कार्यक्रम आणि महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी ‘धम्मभूमी ड्रॅगन पॅलेस टेंपल’ या स्मरणिकेचे प्रकाशन तसेच विविध विकासकामांचा डिजिटल पद्धतीने शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा तथा माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे, इंटरनॅशनल निचिरेन-शू फेलोशिप असोसिएशनचे अध्यक्ष भंते कानसेन मोचिदा, टोकियो (जपान) येथील मिनोबुसान कुओंजी टेम्पलचे व्हेनेरेबल तायकेन आओयामा, बुद्धगया येथील महाबोधी विहाराच्या इंटरनॅशनल त्रिपिटक चँटिंग सेरेमनीच्या मुख्य संरक्षक वांगमो डिक्सी, आमदार डॉ. राजीव पोतदार, माजी आमदार जोगेंद्र कवाडे, यांच्यासह जपान येथील बौद्ध भिक्षू संघाच्या प्रतिनिधींची विशेष उपस्थिती होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भगवान गौतम बुद्धांनी प्रज्ञा, ज्ञान आणि करुणेच्या माध्यमातून मानवतेला नवा विचार दिला. प्रेम, करुणा आणि बंधुतेचा संदेश देणारे त्यांचे विचार आज जगभर स्वीकारले जात आहेत. भारत आणि जपान यांच्यातील संबंधांमध्येही भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

नागपूरला दीक्षाभूमीची पवित्र परंपरा लाभली आहे. त्यासोबतच ड्रॅगन पॅलेस टेम्पलने नागपूरची ओळख जागतिक स्तरावर पोहोचविण्याचे कार्य केले आहे. ‘सेव्हन वंडर्स ऑफ लँड’ ही संकल्पना पुढे येत असून, यामुळे जगभरातील बौद्ध अनुयायी आणि पर्यटक नागपूरकडे आकर्षित होतील. ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या नावाने स्थानिक परिसरातील मेट्रो स्थानकाला देण्यात आलेली ओळखही या स्थळाचे महत्त्व अधोरेखित करणारी आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा तथा माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे यांनी केले. त्यांनी ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या २७ वर्षांच्या वाटचालीची आणि धम्मप्रसाराच्या कार्याची माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसराच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला व मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. राज्य शासनाच्या वतीने दिलेल्या आर्थिक मदतीच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकास कार्यांची त्यांनी यावेळी माहिती दिली. सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवर, बौद्ध धम्माचे अनुयायी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles