– छत्रपती युवा प्रतिष्ठान, चाचेरच्या सामाजिक संदेश देणाऱ्या झाँकीला द्वितीय क्रमांक; ७१ हजार रुपयांचे पारितोषिक
किशोर साहू, मौदा :- रामटेक येथे भारतीय जनसेवा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत छत्रपती युवा प्रतिष्ठान, चाचेर यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या ‘लेकीच्या सुरक्षेसाठी बापाची धडपड अर्थात बाप मायेच्या सागर’ या सामाजिक संदेश देणाऱ्या झाँकीने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. या झाँकीला शोभायात्रेत द्वितीय क्रमांक प्राप्त झाला असून, भारतीय जनसेवा मंडळाच्या वतीने ७१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. या यशामुळे रामटेकच्या सांस्कृतिक व्यासपीठावर चाचेर गावाच्या नावाचा गौरव झाला आहे.
आजच्या समाजात मुलींची सुरक्षा, महिलांचा सन्मान आणि त्यांच्यावरील वाढते अत्याचार हे अत्यंत गंभीर विषय बनले आहेत. या पार्श्वभूमीवर केवळ मनोरंजन न करता कलेच्या माध्यमातून समाजातील ज्वलंत प्रश्न मांडण्याच्या उद्देशाने छत्रपती युवा प्रतिष्ठानच्या टीमने ‘बाप मायेच्या सागर’ ही झाँकी सादर केली.
एका मूक आणि गरीब बापाची मुलगी जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असते. मात्र शाळेच्या परिसरात व्यसनाधीन आणि समाजविघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून मुलींना त्रास दिला जातो. अशा परिस्थितीत अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या मुलीला गंभीर संकटाचा सामना करावा लागतो. आपल्या लेकीच्या सुरक्षेसाठी आणि न्यायासाठी एका असहाय्य बापाला करावी लागणारी धडपड या सादरीकरणातून प्रभावीपणे मांडण्यात आली.
या झाँकीमागील मुख्य भावना कोणत्याही धर्माचा किंवा समाजाचा विषय मांडण्याची नसून, मुलींच्या सुरक्षिततेचा, महिलांच्या सन्मानाचा आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा सामाजिक संदेश जनमानसापर्यंत पोहोचवणे ही होती. मुलींना सुरक्षित वातावरण मिळावे, पालकांनी आपल्या मुलींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे आणि समाजाने अशा घटनांविरोधात एकजुटीने आवाज उठवावा, हा संदेश या सादरीकरणातून देण्यात आला.
झाँकीचे सादरीकरण पाहताना अनेक प्रेक्षक भावूक झाले. विषयाचे गांभीर्य, कलाकारांचा अभिनय आणि सादरीकरणातील भावनिक प्रसंग यामुळे या झाँकीची विशेष चर्चा झाली. क्रमांकापेक्षा समाजापर्यंत पोहोचलेला संदेश अधिक महत्त्वाचा असल्याची भावना प्रतिष्ठानच्या सदस्यांनी व्यक्त केली.
या झाँकीमध्ये प्राजक्ता अढाऊ, वंशिका साखरवाडे, तनुश्री कुल्लरकार, स्वरा सखारवाडे, आकाश साखरवाडे, आर्यन पारधी, प्रणय कुल्लरकार, पियूष कुल्लरकार, अमित बावनकुळे, रोहित मलेवार, सचिन कुल्लरकार आणि सुरज कुल्लरकार या कलाकारांनी भूमिका साकारत आपल्या अभिनयातून सामाजिक विषय प्रभावीपणे मांडला.
या संपूर्ण सादरीकरणासाठी प्रोप्रायटर सचिन दिलीप बावनकुळे यांच्यासह छत्रपती युवा प्रतिष्ठान, चाचेरच्या संपूर्ण टीमने मेहनत घेतली. तसेच या उपक्रमासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहकार्य करणारे चाचेर ग्रामवासी, मित्रपरिवार आणि सर्व सहकाऱ्यांचेही महत्त्वपूर्ण योगदान लाभले.
या यशाबद्दल छत्रपती युवा प्रतिष्ठानच्या वतीने भारतीय जनसेवा मंडळ, रामटेकचे आभार व्यक्त करण्यात आले. तसेच सादरीकरणाला प्रसिद्धीच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल रामटेक राम नगरी पेजचेही विशेष आभार मानण्यात आले.
‘हा पुरस्कार केवळ छत्रपती युवा प्रतिष्ठानचा नसून संपूर्ण चाचेर गावाचा सन्मान आहे. आमचा उद्देश केवळ पारितोषिक मिळवणे नसून कलेच्या माध्यमातून समाजातील महत्त्वाचे प्रश्न मांडणे आणि जनजागृती करणे हा आहे. यापुढेही अशाच सामाजिक विषयांवर अधिक प्रभावी सादरीकरण करण्याचा आमचा प्रयत्न राहील,’ अशी भावना प्रतिष्ठानच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
रामटेकच्या शोभायात्रेत चाचेरच्या कलाकारांनी सादर केलेल्या या झाँकीमुळे गावाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याची ओळख निर्माण झाली असून, या यशाबद्दल छत्रपती युवा प्रतिष्ठान, सर्व कलाकार आणि सहकार्य करणाऱ्या समस्त चाचेर ग्रामवासीयांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.






