संजय कारवटकर, यवतमाळ १९ : यवतमाळ जिल्हा दारू तस्करीसाठी कुप्रसिद्ध असून, अनेक तालुक्यांमध्ये पोलीस ठाण्यांच्या हद्दीत खुलेआम दारू विक्री व वाहतूक सुरू असल्याचे चित्र दिसते. अशाच प्रकरणात वणी पोलिसांनी मोठी कारवाई करत आलिशान चारचाकी कारमधून अवैध विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या दोन व्यक्तींना अटक केली. या कारवाईत ६,८२,९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
१६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी वणी पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाला गुप्त माहिती मिळाली की, पांढऱ्या रंगाच्या आर्टिका कारमधून अवैध दारूची वाहतूक सुरू आहे. ब्राह्मणी फाटा येथे सापळा रचून कार क्रमांक एमएच ३४ बीएफ २१४० ची तपासणी करण्यात आली असता, त्यामध्ये विविध विदेशी कंपनीच्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या. दारूची किंमत ८२,९८० रुपये, तर कारची किंमत ६ लाख रुपये, असा एकूण ६,८२,९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणात प्रवीण शंकरराव मून (५०, रा. घुग्गुस, जिल्हा चंद्रपूर) व विठ्ठल वासुदेव पोलशेट्टीवार (६०, रा. घुग्गुस, जिल्हा चंद्रपूर) या आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ)(इ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली, ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या आदेशाने पोउपनि धिरज गुल्हाने व डीबी पथकाने केली.




