वर्धा १९ : काँग्रेस नेते आणि राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन वर्धा जिल्ह्यातील मतदार यादीतील गंभीर गोंधळ उघड केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जिल्ह्यातील विविध मतदार संघात हजारोंच्या संख्येने मतदारांची नावे दोन ते तीन ठिकाणी आढळून आली आहेत.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगावर आरोप करत, देशात लाखो मतदार बोगस असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आयोगानेही पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. आयोगाने स्थानिक यंत्रणांवर जबाबदारी ढकलली, मात्र वर्धा जिल्ह्यातील वास्तव काँग्रेस नेत्याने समोर आणले आहे.
अग्रवाल यांच्या मते, जिल्ह्यातील केवळ 20 टक्के मतदार याद्यांची छाननी केली असता तब्बल 4,500 मतदारांची नावे दोनदा आढळली. याशिवाय, सुमारे 16 हजार मतदारांचे स्थलांतर झालेले असूनही त्यांच्या नावांचा समावेश जुन्याच यादीत असल्याचे दिसून आले. म्हणजेच हे मतदार एका गावात आणि शहरात अशा दोन्ही ठिकाणी मतदार यादीत कायम आहेत.
त्यांनी सांगितले की, वर्धा जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघांतील तब्बल 16,360 मतदारांची नावे ग्रामपंचायत आणि नगरपरिषद या दोन्ही ठिकाणी असल्याचे उघड झाले आहे. हेच मतदार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदान करतात आणि पुन्हा नगरपरिषद निवडणुकीतही मत देतात. विशेषतः वर्धा, आर्वी आणि हिंगणघाट या मतदारसंघांमध्ये हा घोळ सर्वाधिक असल्याचे त्यांनी सांगितले.
मॅन्युअल पीडीएफ डेटातून हा प्रकार उघडकीस आल्याचे अग्रवाल यांनी स्पष्ट केले. एका व्यक्तीचे नाव एकाच बूथवर दोन ते तीन वेळा, वेगवेगळ्या इपीक नंबरसह नोंदवलेले असल्याचे उदाहरण त्यांनी दिले. ग्रामीण क्षेत्रातील नावं शहरी क्षेत्रातील मतदार याद्यांमध्ये आढळून येणे ही मोठी चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.








